
कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरू,ऑलिव्ह रिडलेचे पहिले घरटे गुहागर किनारी,
कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरू झाला असून, यंदाच्या हंगामातील पहिले घरटे गुहागर किनाऱ्यावर आढळले आहे.मागील आठवड्यात त्याची नोंद झाली असून, कासवांची १२८ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. थंडीला सुरुवात झाल्यानंतर यंदा विणीचा हंगाम वेळेत सुरू झाल्याचे कांदळवन कक्षाकडून सांगण्यात आले.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी ऑलिव्ह रिडले सागरी कासवांची वीण होते. समुद्री कासवांमधील ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर ग्रीन सी कासवांची घरटीदेखील सापडलेली आहेत. गुहागरचा किनारा हा महाराष्ट्रात सागरी कासवांच्या विणीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सागरी कासवांची सर्वात जास्त घरटी ही गुहागरच्या किनाऱ्यावर आढळतात. सहा किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर गेल्यावर्षी ३४२ घरटी आढळली होती. या परिस्थितीत यंदाच्या हंगामातील पहिले घरटे १७ नोव्हेंबरला सकाळी गुहागर किनाऱ्यावर आढळल्याचे रत्नागिरी कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामध्ये आढळलेल्या १२८ अंड्यांना कासवमित्रांनी हॅचरीमध्ये सुरक्षित हलविले आहे. रविवारी वेळणेश्वर किनाऱ्यावर अंडी न घालताच एक मादी समुद्रात गेली होती. त्यामुळे हीच मादी गुहागर किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. गुहागर किनाऱ्यावर ११ कासवमित्रांच्या मदतीने कासव संवर्धनाचे काम होते. गुहागर किनाऱ्यावर कासवांची घरटी सापडण्याची वर्षागणिक वाढणारी संख्या लक्षात घेता, यंदा पाच हॅचरी बांधून कासव संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे.




