
पुणे-मुंबई विमानाचे तिकीट १ लाख रुपये; ‘इंडिगो’च्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे अन्य विमान कंपन्यांच्या तिकीट दरात वाढ!
इंडिगो कंपनीच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा परिणाम अन्य विमान कंपन्यांच्या तिकीट दरावर झाला आहे. देशातील अनेक मार्गांवरील तिकीट दर गगनाला भिडले असून, एअर इंडियाच्या पुणे ते मुंबई विमानाचा तिकीट दर एक लाखावर गेला आहे, तर नागपूर ते मुंबई विमानासाठी ३० हजारांहून अधिक रक्कम आकारली जात असल्याचे दिसून येत आहे.गेल्या काही दिवसांपासून इंडिगो कंपनीचे वेळापत्रक बिघडले आहे. इंडिगोची पुणे विमानतळावरील ४६ विमाने रद्द करण्यात आली. त्यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू, रांची आणि राज्यांतर्गत जाणारी २३ विमाने, इतर राज्यांतून पुण्यात येणारी २३ विमाने यांचा समावेश आहे.
अनेक विमानांच्या वेळापत्रकात अनेक वेळा बदल करण्यात आला. प्रवाशांची विमानतळावर प्रचंड गर्दी झाली. अनेक प्रवाशांना विमानतळावर ताटकळावे लागत आहे. बिघडलेल्या वेळापत्रकामुळे अनेकांच्या कामाचे नियोजन कोलमडले आहे. तर, काहींच्या सहलींवर परिणाम झाला आहे. परिणामी अनेकांना हॉटेलमध्ये राहण्याचा अधिकचा खर्च करावा लागत आहे. वेगवेगळ्या संकेतस्थळांचा आढावा घेतला असता, इंडिगोवगळता अन्य कंपन्यांच्या विमानांचे पुणे-मुंबई, मुंबई-नागपूर, नागपूर-पुणे मार्गावरील तिकिटांचा दर ३० हजारांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते.
‘आमचे विमान रद्द झाले, मात्र सामान पुढे गेले आहे. विमानांच्या वेळा सतत बदलत आहेत किंवा उड्डाणे रद्द होत आहेत. काही लोक तर दोन दिवसांपासून विमानतळावर आहेत. विमान रद्द झाल्याने आता परतावा मिळवण्याचा प्रयत्न आहे,’ असे शंतनू चांदजकर यांनी सांगितले.भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सह सरव्यवस्थापक जगदीश उरकुडे म्हणाले, ‘इंडिगोच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे अन्य विमान कंपन्यांच्या विमानोड्डाणावर परिणाम होता कामा नये. दुपारी ४ वाजेपर्यंत ४६ उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. इंडिगोच्या विमानांना वेळ देण्याचा प्रयत्न आहे. मात्र, शुक्रवारी आजपर्यंतची सर्वाधिक उड्डाणे रद्द करावी लागली. शनिवारपासून परिस्थिती बरीच नियंत्रणात येईल.’
इंडिगोच्या सेवेत झालेल्या अडचणींमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. डीजीसीएच्या एफडीटीएलच्या आदेशाला तत्काळ स्थगिती देण्यात आली आहे.




