केंद्र सरकारचा विमान कंपन्यांना चाप!.. अंतरानुसार प्रवास शुल्क मर्यादा केली निश्चित!!


इंडिगो विमान कंपनीच्या व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द होऊन प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच संधीचा फायदा घेऊन इतर विमान कंपन्यांकडून अवाजवी भाडेवाढ करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने शनिवारी विशेष आदेश जारी करत देशांतर्गत विमान प्रवासासाठी कमाल शुल्क मर्यादा निश्चित केली.

त्यानुसार देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रवास अंतरावर आधारित कमाल शुल्क मर्यादा लागू करण्यात आली असून ५०० किलोमीटर अंतरापर्यंत ७ हजार ५०० रुपये , ५०० ते १००० किलोमीटर अंतरापर्यंत १२ हजार रुपये, १००० ते १५०० किलोमीटर अंतरापर्यंत १५ हजार रुपये आणि १५०० किलोमीटर अंतरापेक्षा अधिक अंतरासाठी १८ हजार रुपये शुल्क आकारण्याबाबात निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये ‘ युजर डेव्हलपमेंट शुल्क (युडीएफ), प्रवासी सेवा शुल्क (पीएसएफ) आणि इतर कराविना शुल्क निश्चित करण्यात आले असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जोपर्यंत विमानसेवा सुरळीत होत नाही, तोपर्यंत हे दर लागू राहणार असून ही मर्यादा सर्व प्रकारच्या आगाऊ आरक्षणासाठी लागू असणार आहे. त्यानुसार संकेतस्थळ, मध्यस्थामार्फत (एजंट) किंवा कंपनीने प्रदान केलेल्या सुविधेंतर्गत सर्वांसाठी एक दर निश्चित असणार आहे. तसेच पुरेशी आसन उपलपब्धता ठेवावी. अडचणीच्या काळात कोणीही अडवणूक करू नये, असे स्पष्ट शब्दात मंत्रालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत.

इंडिगो विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून देशभरातील विमानसेवा कोलमडली आहे. विमान कंपनीने नियोजित वेळापत्रकातील निम्म्याहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द केली. विमानांच्या उड्डाणांमध्ये १० ते १५ तासांचा विलंब होत असून प्रवाशांना विमानतळांवर प्रतीक्षेत बसावे लागले. याच संधीचा फायदा घेऊन इतर विमानकंपन्यांनी विमान सेवा शुल्कात वाढ करून प्रवाशा्ंची अडवणूक करण्यास सुरुवात केली. पुणे ते मुंबई विमान प्रवासासाठी एका विमान कंपनीकडून थेट ६५ हजारांपासून पुढे एक लाख रुपये पर्यंत प्रवासी शुल्क निश्चित केले. तसेच इतर ठिकाणीही अशीच परिस्थिती असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करत नागरी उड्डाण मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

इंडिगो विमान कंपनीच्या सेवेतील त्रुटींमुळे देशभरातील विमानसेवेला आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, अशा प्रसंगाच्या काळात इतर विमान कंपन्यांनी प्रवाशा्ंची अडवणूक न करता सहकार्य करावे. प्रवास शुल्क अंतरानुसार निश्चित करण्यात आले असून या निर्देशांचे विमानकंपन्यांनी काटेकोर पालन करावे.- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button