एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्यमान कार्ड आवश्यक


रत्नागिरी, दि. 5 ) : एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णाकडे रेशनकार्ड, आधारकार्डसह आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी जवळच्या सेतु सुविधा केंद्र, सरकारी रुग्णालय, किंवा नोंदणीकृत आरोग्यकेंद्रावर जाऊन आपले आयुष्यमान कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन सदस्य सचिव जिल्हा संनियत्रण समिती तथा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील आजारांची संख्या आता १ हजार ३५६ वरून २ हजार ३९९ करण्यात आली तसेच पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड निर्माण केला जाणार आहे. या निर्णयामुळे रत्नागिरी सह राज्यातील गरीब आणि गरजूंना मोठा दिलासा मिळणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब रुग्णांना सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयातही मोफत उपचार,
शस्त्रक्रियेची सोय म्हणून जनआरोग्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांप्रमाणेच ३१ खासगी १७ व शासकीय १४ रुग्णालयांचादेखील समावेश आहे. या योजनेत यापूर्वी १ हजार ३५६ आजारांवरच उपचार होत होते. आता ही संख्या २ हजार ३९९ पर्यंत वाढविण्यात आले आहेत. आगामी काळात याची अंमलबजावणी होणार आहे. हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड विकार, मेंदूविकार यांसारख्या गंभीर आजारांसह नव्याने समाविष्ट झालेल्या व्याधींवरही रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. महागड्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी आता रुग्णांना पाच लाखांच्या पुढील निधीही मिळणार आहे.त्यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

योजनेसाठी निकष आणि कागदपत्रे
जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णाकडे रेशन कार्ड, आधार कार्ड व आयुष्यमान कार्ड आवश्यक आहे. एकत्रित आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील पात्र रुग्णांना लाभ मिळत आहे. आता पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड निर्माण करण्यात आला.
आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
आधार कार्ड, रेशन कार्ड, आधार नंबरशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक.

तरी आयुष्मान कार्ड काढण्यासाठी नागरिकांनी जवळच्या सेतु सुविधा केंद्र, सरकारी रुग्णालय, किंवा
नोंदणीकृत आरोग्याकेंद्रावर जाऊन आपले आयुष्यमान कार्ड बनवून घ्यावे. सर्व पात्र लाभर्थ्यांनी आयुष्यमान कार्ड लवकरात लवकर तयार करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button