
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लवकरच पूर्ण होणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आज 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शनिवारी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिलीयानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली.
पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित पद्धतीने सुरळीत पार पडले तर हे स्मारक पुढील 6 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.शंभर फुटाचा पायथा आणि 350 फूट उंच पुतळा असे एकंदरीत भव्य स्मारक असणार आहे. या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची शंभर टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत. सध्या अंतर्गत सजावटीची कामे प्रगतीपथावर असून, बाह्य विकासाची कामेही सुरू आहेत. पुतळ्याच्या पॅनेल कास्टिंगचे काम सध्या पूर्ण झाले आहे. शंभर फूट उंचीच्या स्मारक इमारतीच्या विस्तीर्ण चौथऱ्यावर 350 फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूचे आवरण असलेला पुतळा उभारला जाणार आहे.
पुतळ्याच्या पायथ्याचे काम सुरू आहे तर पुतळ्याच्या आर्मेचर फॅब्रिकेशनचे काम सुरू असून, सहा हजार टन पोलाद लागणार आहे. त्यापैकी 1400 टन पोलाद आले असून, 650 टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे. कांस्य धातूच्या आवरणाचे कामही सुरु असून पुतळ्याच्या दोन्ही बुटांच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरील शिलाई, लेस हुबेहूब दिसत आहे. दरम्यान, या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 ऑक्टोबर 2015 रोजी केलं होतं




