५१ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत धाराशिव, सोलापूर, ठाणे व पुण्याची जोरदार कामगिरी

मुलींच्या गटात रत्नागिरी आणि मुलांच्या गटात साताऱ्याची चमक : अहिल्यानगरच्या मैदानावर वेग, दमदार रणनीती आणि रोमांचकारी संघर्ष

अहिल्यानगर : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुऱ्हाणपूर येथे सुरू झालेल्या ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी रोमहर्षक क्षणांचा मनसोक्त आनंद घेतला. मुलींच्या गटात धाराशिव, सोलापूर, ठाणे, सांगली, पुणे आणि रत्नागिरी यांनी प्रभावी कामगिरी केली, तर मुलांच्या गटात धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, सातारा, नाशिक आणि पुणे संघांनी दमदार विजय मिळवत स्पर्धेत जोरदार मुसंडी मारली.

मुली गटातील झंझावत प्रदर्शन
सकाळच्या पहिल्या सामन्यात धाराशिवच्या मुलींनी रायगडवर १ डाव ३२ गुणांनी (४४-१२) दणदणीत विजय मिळवला. संघातील मैथिली पवारने ४.२० मिनिटे पळती खेळ करत तब्बल १० गुणांची कमाई करून सामन्याची शान वाढवली. राही पाटील (२.१० मि. संरक्षण व २ गुण), मुग्धा वीर (३.१० मि. संरक्षण व २ गुण), श्रावणी गुंड (३.२० मि. संरक्षण व २ गुण) यांनीही भक्कम खेळ सादर केला.
दुसऱ्या सामन्यात सोलापूरने धुळेचा १ डाव १९ गुणांनी (३३-१४) पराभव केला. अश्विनी मांडवे (३ मि. संरक्षण व ४ गुण) आणि कल्याणी लामकाणे (३.०१ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. धुळ्यातर्फे हर्षदा कोळी (६ गुण) हिने संघाचा मान राखला.

ठाणे संघाने चुरशीच्या लढतीत मुंबईचा १ डाव १३ गुणांनी (२९-१६) पराभव केला. प्राची वांगडे (३ मि. संरक्षण व ४ गुण), वैष्णवी जाधव (नाबाद २.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी विजयात सिंहाचा वाटा उचलला.

रत्नागिरीने जालन्यावर ५ गुणांनी (३६-३१) अतिशय कडवी लढत देत विजय संपादन केला. रिद्धी चव्हाण (२,३ मि. संरक्षण व २ गुण) व वैष्णवी फुटक (८ गुण) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

अन्य सामन्यांचे निकाल:
सांगली विजय – नंदुरबार १ डाव ३२ (४६-१४), सातारा विजय – मुंबई उपनगर ९ गुणांनी (३१-२२), पुणे विजय – अहिल्यानगर १ डाव १६ गुणांनी (२४-८), नाशिक विजय – पालघर १ डाव १७ गुण.

मुलांच्या गटात चुरस आणि थरार
धाराशिव संघाने रायगडवर १ डाव २१ गुणांनी (३०-१८) मात केली. हारद्या वसावे (४.२० मि.) आणि राज जाधव (३.२० मि.) यांनी चमकदार पळतीचा खेळ केला. रायगडकडून ओम जगदाळेने ८ गुणांची आक्रमक खेळी केली.

सोलापूरने जालना संघाचा १ डाव ८ गुणांनी (२८-२०) पराभव केला. अरमान शेख (३ मि. संरक्षण व ८ गुण) आणि शंभूराज चंदनशिव (२.५० मि. संरक्षण) चमकले. जालना संघाचा रोहित चारवंडेने १० गुणांची आगळी कामगिरी करून सर्वांचे कौतुक मिळवले.

अहिल्यानगरने बीडचा १ डाव १७ गुणांनी (३१- १४) पराभव करत घरच्या मैदानावर दमदार प्रदर्शन केले. साई लव्हाट (३.३० मि. संरक्षण) विशेष ठरला.

ठाणे संघाने रोमांचक लढतीत मुंबई उपनगरचा ७ गुणांनी (३१-२४) पराभव केला. ड्रीम रनमधून मिळवलेले ४ गुण विजयात निर्णायक ठरले. ओंमकार सावंत व वेदांत यांनी मोलाची कामगिरी बजावली.

साताऱ्याने मुंबई संघावर रोमांचक १ गुणांनी (२७-२६) विजय मिळवला. अंतिम क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारा सामना खेळवला गेला.

अन्य सामन्यांचे निकाल:
• नाशिक विजय – रत्नागिरी १ डाव ११ गुणांनी (२७-१६)
• पुणे विजय – धुळे १ डाव २७ गुणांनी (४५-१८)
• सांगली विजय – नंदुरबार १ डाव ५ गुणांनी (२२-१७)

पहिल्या दोन दिवसातच स्पर्धेने उंचावला रोमांचाचा कळस
अत्यंत उत्साही वातावरणात आणि भरपूर प्रेक्षकांच्या उपस्थितीत सर्व सामने जोश व चुरशीने खेळले गेले. पुढील दिवसातील बाद फेरीतील सामने आणखी रंगतदार होतील, अशी उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button