
राजापूरमध्ये ७ डिसेंबरपासून तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
राजापूर : रत्नागिरी जिल्हा परिषद, राजापूर पंचायत समिती तसेच विज्ञान व गणित मंडळाचे नाटे आंबोळगड केंद्र आणि मॉडर्न हायस्कूल साखरीनाटे यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे राजापूर तालुका विज्ञान प्रदर्शन ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत शासकीय मत्स्यव्यवसाय शाळा साखरीनाटे येथे होणार आहे.
प्रदर्शनासाठी “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” हा विषय असून या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळात विज्ञानदिंडी, दुपारी २ ते ५ या वेळेत नोंदणी व प्रदर्शन मांडणी केली जाणार आहे. ८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते १ या वेळेत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन, दुपारी १ ते २ यावेळेत भोजन, दुपारी २ ते ५ वेळेत प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धा होणार आहे. उद्घाटन समारंभाला उद्घाटक म्हणून आमदार किरण सामंत उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साखरीनाटे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमजद बोरकर भूषविणार आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. जॅस्मिन, तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, साखरीनाटे सरपंच सौ. गुलजार ठाकूर, उपसरपंच धालवेलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षण श्री. वाघ, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष भारत कांबळे, विज्ञान मंडळ जिल्हा कार्यवाह सुभाष सोकासने आदि उपस्थित राहणार आहेत.
९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता विज्ञान प्रतिकृती परीक्षण, दुपारी १२.३० वाजता भोजन, दुपारी १.३० वाजता पारितोषिक वितरण समारंभ होईल. खासदार नारायण राणे या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी जिल्हाशिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले आदी उपस्थित राहणार आहेत.




