
रत्नागिरीच्या संस्कृत पाठशाळेत तीन जानेवारीपासून श्रीमद्भवद्गीता शिकवणी वर्ग
रत्नागिरी : श्रीमद्भगवद्गीता हा मानवी जीवनाचे सार सांगणारा आणि जीवनाला दिशा देणारा महान ग्रंथ आहे. आजच्या कलियुगात तर गीतेचा संदेश पावलोपावली मार्गदर्शक ठरणारा आहे. रत्नागिरीतील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेतर्फे येत्या जानेवारी महिन्यापासून श्रीमद्भगवद्गीता शिकवणी वर्ग सुरू केले जाणार आहेत. १२ ते ७० या वयोगटातील कोणीही या वर्गांमध्ये येऊन गीता शिकू शकणार आहे. त्यामुळेच अधिकाधिक रत्नागिरीकरांनी या गीता शिकवणी वर्गांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य श्री. मंदार भिडे आणि उपाध्यक्षा सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी केले आहे.
श्रीमद्भवद्गीता शिकवणी वर्ग तीन जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असून, दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी चार ते पाच या वेळेत गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेतच ते होणार आहेत. यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून गीतेचे सर्व म्हणजे १८ अध्याय शिकवले जाणार आहेत. गीता ऑनलाइन शिकवणाऱ्या अनेक वर्गांचा पर्याय आज उपलब्ध असला, तरी प्रत्यक्ष समोरासमोर शिकण्याचा आनंद आणि अनुभव काही वेगळाच असतो. म्हणूनच हे प्रत्यक्ष शिकवणी वर्ग पाठशाळेतर्फे सुरू करण्यात येत आहेत. प्रत्यक्ष आणि सामूहिक पठणामुळे मानसिक ताण कमी होऊन मनःशांती मिळण्यासाठीही उपयोग होतो. या वर्गात येऊन गीता शिकू इच्छिणाऱ्यांनी २० डिसेंबर २०२५ पूर्वी आपले नाव नोंदवून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेतर्फे करण्यात आले आहे. हे शिकवणी वर्ग निःशुल्क आहेत; मात्र प्रत्येकी १०० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे.
नावनोंदणीसाठी संपर्क :
वैद्य श्री. मंदार भिडे (अध्यक्ष) : ९८९०९९१२६९
सौ. प्रतिभा श. प्रभुदेसाई (उपाध्यक्ष) : ९५४५५०६२५३




