
पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते?
मुंबई राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपणार आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दाते सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक म्हणून दिल्लीत नियुक्त आहेत. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने सात अधिकार्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली होती. त्यामध्ये सदानंद दाते यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. ते १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
महाराष्ट्र केडरचे अधिकारी असलेले सदानंद दाते राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख तथा डीजीपी होते. नवनिर्मित मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त म्हणूनही दाते यांनी काम पाहिलेले आहे.
२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्यांच्या कामगिरीमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. दाते यांचा जन्म १४ डिसेंबर १९६६ रोजीचा आहे. त्यांची डीजीपीपदी नियुक्ती झाल्यास दाते यांच्यासाठी ती वाढदिवसाची भेट मानली जात आहे.
कामा आल्बेस रुग्णालयातील महिला व मुले रुग्णांना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ओलिस धरले होते. त्यावेळी त्यांची सुखरूप सुटका दातेंनी केली होती. त्यावेळी दाते यांना दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्या लागल्या होत्या. मात्र त्यांनी काही पोलिसांसह दहशतवाद्यांचा सामना केला. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती शौर्यपदकाने गौरविण्यात आले होते. प्रामाणिक आणि सचोटीचे अधिकारी म्हणून अधिकारी सदानंद दाते यांची ओळख आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणार्या अजमल कसाबला फाशी देण्यासाठी आर्थररोड तुरुंगातून पुण्यातील येरवडा तुरुंगात घेऊन जाण्याची महत्त्वाची जबाबदारी देखील दाते यांनी यशस्वी पूर्ण केली आहे.
www.konkantoday.com




