
दहिवलीच्या डॉ. सचिन घाग यांचे अमेरिकेत डोळ्यांच्या विकारांवर संशोधन
ग्लॉकोमा आणि फुक्स डिस्ट्रोफी यांसारख्या गंभीर डोळ्यांच्या विकारांचे मूळ कारणांचा शोध आपल्या चिपळूण तालुक्यातील दहिवलीच्या सुपुत्राने घेतला आहे. त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाचे ठरत असून जिल्ह्यासह तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दहिवली येथील डॉ. सचिन घाग यांनी केलेल्या या संशोधनामुळे त्यांना इंडियाना युनिर्व्हसिटीने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या यशाबद्दल कोकणातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
त्यांनी आपल्याच कोकणातून जागतिक विज्ञान प्रवासाला सुरूवात केली. त्यांचा शैक्षणिक पायरीची सुरूवात नायशी विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेतून झाली. पुढे १२ वीसाठी ते गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत दाखल झाले. मुंबई विद्यापीठातून बीएस (जैवतंत्रज्ञान) आणि एमएस (बायोफिजिक्स) या पदव्या त्यांनी मिळवल्या. येथे त्यांनी विज्ञानाचा भक्कम पाया घातला आणि संशोधनाकडे झुकणारी दृष्टी विकसित केली.
यानंतर मुंबईत त्यांनी कमी वयातील मेनोपॉजची लक्षणे आणि त्याची अनुवंशिक कारणे यावर संशोधन केले. या काळात त्यांनी तरूणांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. इथच लॅबमधलं संशोधन शेवटी माणसांच्या जीवनात बदल घडवण्यासाठीच असतं ही जाणीव अधिक घट्ट झाली. संशोधनाची ओढ लक्षात घेवून त्यांनी अमेरिकेत पीएच.डी. करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी इंडियाना युनिर्व्हसिटी, ब्लूमिंग्टन येथे प्रवेश मिळवला. येथे त्यांनी डोळ्यांच्या विकारांवरील प्रकल्पांवर काम सुरू केले.www.konkantoday.com




