
परतीच्या पावसामुळे चिपळुणातील २,२७७ शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
अनुकूल वातावरणामुळे तालुक्यातील भातशेती यंदा चांगलीच बहरली असताना परतीच्या पावसामुळे बहरलेल्या शेतीचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील १६८ गावामध्ये आतापर्यंत ४९५.६५ हेक्टरवर शेतीचे पंचमाने करण्यात आले असून यामध्ये २२७७ बाधित शेतकर्यांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसात नुकसानीचे पंचमाने पूर्ण होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी दिली.
कोकणात भातशेती हे प्रमुख पिकापैकी एक असून तालुक्यातील बहुतांशी शेतकरी याच लागवडीला प्राधान्य देत आले आहेत. भौगोलिकदृष्ट्या तालुका विस्तारित असून त्यामध्ये ७ हजार हेक्टर भातशेतीचे क्षेत्र आहे. यंदा मे महिन्यातच पावसाने सुरुवात केल्यामुळे पेरणी कामाचा खोळंबा झाला होता. शिवाय चिखमय शेतीत पेरणी कशी करावी, असा मोठा प्रश्न भेडसावू लागला होता. असे असताना पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कशीबशी पेरणी कामे पूर्णत्वास गेली होती. जून, जुलै महिन्यात भातलावणी दरम्यान मुबलक पाऊस व त्यानंतर शेतीस मिळालेले पोषक वातावरण यामुळे यंदा तालुक्यात भातशेती चांगलीच बहरली होती. ऑक्टोबर महिन्यात हळवे भात पीक कापणीस तयार झाले असताना काहीठिकाणी पावसाचा अंदाज घेत शेतकरीवर्गाने कापणी देखील सुरू केली आहे. असे असताना परतीच्या पावसाने मात्र चांगलाच घोळ घातला.www.konkantoday.com




