
कालीदास स्मृती व्याख्यानमालेचे ६९ वे वर्ष
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात ६९ व्या कालिदास स्मृति समारोह व्याख्यानमालेचे आयोजन ८ व ९ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात केले आहे. ही व्याख्यानमाला पुणे येथील संस्कृत विदुषी डॉ. सुचेता परांजपे गुंफणार आहेत.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ८ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजता डॉ. पराजंपे “या महाभारत : समज आणि गैरसमज” या विषयावर आणि दुसरे पुष्प ९ डिसेंबरला “महाभारतातील निवडक स्त्री – व्यक्तिरेखा” या विषयावर गुंफणार आहेत. महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे.
डॉ. सुचेता परांजपे यांनी शालांत परीक्षेत दोन सुवर्णपदके, नऊ पारितोषिकांसह गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करूनही संस्कृत अध्ययन अध्यापन कार्याचा ध्यास असल्याने कला शाखेत प्रवेश घेतला. पुणे विद्यापीठातून त्यांनी बीए, एमए संस्कृतमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. वैदिक साहित्यावर आधारित संशोधन कार्यावर पीएच. डी. मिळवली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत व भारतविद्या या विषयांचे अध्यापन केले आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत महाभारतावरील प्रकल्पात कार्य, इन्फोसिस फेलोशिप प्राप्त आहे. जर्मनीस्थित लेप्झिंग विद्यापीठात आणि अमेरिकेतील मॅकॅलेस्टर कॉलेजमध्ये संस्कृतचे अध्यापन केले आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील जननायक या चित्ररूप ग्रंथाचे संपादन व चिं. ग. काशीकर यांच्यावरील श्रौतर्षी गौरवग्रंथांचे संपादन व अन्य तीन पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विद्यार्थी, पालक, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी त्यांच्या व्याख्यानमालेस जरूर उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, गोगटे महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले आहे.




