वाहतुकीची कोंडी व अनुचित प्रकार टाळण्याकरिता चिपळूणमधील अलोरे कॉलनी ते देउळवाडी मुंडे पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद


*रत्नागिरी, – वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता चिपळूण तालुक्यातील अलोरे कॉलनी ते देउळवाडी मुंडे पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद करुन, वाहतूक करण्याकरिता पर्यायी मार्ग खडपोली पेढांबे अलोरे शिरगांव कुंभार्ली कोड फणसवणे रस्ता प्रजिमा 28 पर्यंत वळविण्यात यावी. ​वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. ​वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे. असा आदेश देणारी अधिसूचना अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चिपळूण तालुक्यातील विकास कामांना दिलेल्या भेटी दरम्यान, अलोरे कॉलनी ते देउळवाडी मुंडे पूल रस्ता ग्रामा 258, या रस्त्यावरील कि. मी 0/050 मधील पुलाची पहाणी केली असता, सदर पूल अतिशय नादुरुस्त झाला असल्याचे आढळले. सदर पूल 80.00 मीटर लांबीचा व 2.50 मीटर रुंदीचा असून पुलावरून खासगी वाहतूक सुरू आहे.
​या पुलाचे 8 पिलर पूर्णपणे क्षतिग्रस्त झाले असून, सदर पिलर व पुलाच्या खालच्या बाजुचे कॉंक्रीट पडल्याने स्टील उघडे पडले आहे. तसेच 2 पिलरच्या पायाच्या तळापर्यंत मोठी भगदाडे पडली असून, सदर पूल कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या पुलाचे बांधकाम सन 2010 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत करण्यात आले आहे.
​कार्यकारी अभियंता यांनी केलेली पहाणी व उप अभियंता, जि. प. बांधकाम उप विभाग चिपळूण यांनी दिलेल्या अहवाला नुसार, पूल वापरण्यास अतिशय धोकादायक झाल्याचे दिसत असून, वाहतुकीस बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर पूल वाहतुकीस बंद करण्याबाबत आपल्या स्तरावरून अधिसूचना निर्गमित करण्यास विनंती केली आहे. तसेच सदर पुलावरील वाहतुक पर्यायी मार्ग- खडपोली पेढांबे अलोरे शिरगांव कुंभार्ली कोड फणसवणे रस्ता प्रजिमा 28 पर्यंत वळविण्याबाबत विनंती केली आहे.
​ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी सादर केलेली वस्तुस्थिती विचारात घेता, जिल्हादंडाधिकारी यांच्या मान्यतेने, अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी खालीलप्रमाणे आदेश दिला आहे.
​वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता अलोरे कॉलनी ते देउळवाडी मुंडे पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद करुन, वाहतूक करण्याकरिता पर्यायी मार्ग खडपोली पेढांबे अलोरे शिरगांव कुंभार्ली कोड फणसवणे रस्ता प्रजिमा 28 पर्यंत वळविण्यात यावी.
​वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे.
​वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button