
भाजपचे पक्ष प्रवेश काही केल्या थांबेनात! पुन्हा शिंदेंना बालेकिल्ल्यात धक्का; दोन प्रभावी नेत्यांच्या हाती ‘कमळ’
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाणे जिल्ह्यातील राजकारणाची मोठी चर्चा आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महायुती स्वतंत्र लढली. पण या निवडणुकीत भाजप-शिवसेना यांच्यातील संघर्ष शिगला पोहचला.उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ल्यातच घेरण्याचा डाव भाजपने आखला असल्याची जोरदार चर्चा आहे.
मधल्या काळात शिंदेंच्या सेनेतील अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांना भाजपने आपलेसे केले. निवडणुकांच्या धामधूमीतच एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपली नाराजी शहांपुढे व्यक्त केली. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत कलह थांबेल अशी आशा असतानाच पुन्हा एकदा बालेकिल्ल्यातच शिंदेंना भाजपने धक्का दिला आहे.शिंदे गटाचे कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख विकास देसले आणि ज्येष्ठ नेते सदानंद थरवळ यांचे पुत्र अभिजीत थरवळ यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकांच्या माहोलात दोन प्रभावी नेत्यांनी शिंदेंची साथ सोडून कमळ हाती घेतल्याने शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मित्रपक्षांतील पर्यायाने शिवसेनेतील पदाधिकारी माजी नगरसेवकांना गळाला लावण्यात भाजप यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झाल्याने पुन्हा एकदा चव्हाण विरुद्ध शिंदे संघर्षांची चर्चा स्थानिक राजकारणात होत आहे.बुधवारी देसले आणि थरवळ यांचा पक्ष प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. चव्हाण हे कल्याण-डोंबिवली पट्ट्यात शिंदे समर्थकांना लक्ष्य करत असल्याचे चित्र यामुळे पाहायला मिळत आहे.




