
मोठी बातमी! ३१ जानेवारीपूर्वीच संपणार निवडणुका; दुसऱ्या टप्प्यात महापालिकांची निवडणूक?
राज्यातील २७ पैकी दोन महापालिका व ३२ पैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाच्या मर्यादेचे पालन झालेले नाही. आरक्षणाचा घोळ सध्या सुरु असला, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारीपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.त्यामुळे आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांची निवडणूक घेण्याचे नियोजन केले असून त्याची घोषणा १५ ते १७ डिसेंबर दरम्यान होऊ शकते, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
चंद्रपूर व नागपूर महापालिकेच्या आरक्षणात ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. याशिवाय राज्यातील १७ जिल्हा परिषदांसह तीन जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्येही अशीच कार्यवाही झाली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येणार नाही असे आदेश दिले आहेत. ५० टक्क्यांची मर्यादा पालन केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोणताही अडथळा नाही. मात्र, १७ जिल्हा परिषदांची निवडणूक मागे ठेवून १५ जिल्हा परिषदांची निवडणूक घेता येत नाही.
त्यामुळे आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांची निवडणूक घेण्याचे नियाजन केले आहे. मात्र, त्यासाठी १० डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्या दिवशी महापालिकांची वॉर्डनिहाय मतदार यादी अंतिम होणार आहे. आयोगाकडून १० डिसेंबर रोजी त्यासंदर्भात आढावा घेतला जाईल. त्यानंतर दुसरा टप्पा जाहीर केला जाईल, असे आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.




