
नाणार येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक
राजापूर : नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार पाळेकरवाडी येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे पूर्ण करत नाटे पोलिसांनी चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, ११ मे ते ९ ऑक्टोबर या कालावधीत नाणार पाळेकरवाडी येथील रहिवासी सुरेश मरतू प्रभू यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून चोरी केली होती. यावेळी चोरट्याने एलजी कंपनीचा काळ्या रंगाचा स्मार्ट टीव्ही, टाटा कंपनीचा सेट-अप बॉक्स आणि एक लाल रंगाची एच.पी. गॅस कंपनीची सिलेंडर टाकी असा एकूण १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला होता.
या घरफोडीच्या घटनेनंतर, १२ ऑक्टोबर रोजी नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७६/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३२४(४) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गुन्ह्याचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला.
तपासादरम्यान, नाटे पोलिसांनी २७ नोव्हेंबर रोजी या गुन्ह्यातील संशयित आरोपी विजय मधुकर गुरव (वय २९, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याचा कोल्हापूर कळंबा कारागृह येथून ताबा घेतला. नाटे पोलीस ठाण्यात आरोपीकडे कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपी विजय गुरव याने या चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने कारवाई करत मेमोरेंडम पंचनाम्याच्या वेळी चोरलेला सर्वच्या सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. यामुळे चोरीस गेलेला संपूर्ण १० हजारांचा मुद्देमाल नाटे पोलीस ठाण्यामार्फत तक्रारदाराला परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आरोपी विजय मधुकर गुरव यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नाटे पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी आणि त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. झगडे, सहाय्यक पोलीस फौजदार चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, आणि पोलीस कॉन्स्टेबल कुसळे यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.




