
हर्चे-रत्नागिरीचे सुपुत्र डॉ. अनिकेत आनंदकुमार मयेकर यांच्या ललित लेखसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रथम उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
- साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचा मान समजला जाणारा महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आयोजित वाड्मय पुरस्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याचे साहित्य वैभव वाढवणारे आणि हर्चे गावचे सुपुत्र डॉ. अनिकेत आनंदकुमार मयेकर यांना त्यांच्या ‘स्टेथोस्कोप’ या ललित लेखसंग्रहासाठी स्व. अनुराधा नंदुरकर स्मृती प्रित्यर्थ प्रथम क्रमांकाचा हा प्रतिष्ठित उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विशेष म्हणजे, डॉ. मयेकर यांच्या प्रकाशित झालेल्या पहिल्याच पुस्तकाला हा पाहिला मानाचा सन्मान लाभला आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाने मराठी साहित्य वर्तुळात त्यांची नोंद घेतली गेली आहे.
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषद – शांता शेळके सभागृह, संत तुकाराम संकुल या ठिकाणी संपन्न झाला.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याचे अध्यक्षस्थान जेष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी भूषवले. तर, जेष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री मा. गिरीश प्रभुणे यांच्या शुभहस्ते डॉ. अनिकेत मयेकर यांच्यासह इतर पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. कादंबरी, कथा, कविता, ललित आणि बालसाहित्य या पाच साहित्य विभागातील सर्वोत्कृष्ट लेखकांना या वेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्चे गावच्या मातीतील साहित्यिक प्रतिभा असलेले सुप्रसिद्ध डॉ. अनिकेत आनंदकुमार मयेकर यांनी ‘सोनचाफा प्रकाशना’च्या आपल्या ललित लेखनाच्या या पहिल्याच संग्रहाने अश्या प्रकारे मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या लेखनाची नोंद घेत त्यांना ललित लेखन विभागासाठी प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. पहिल्याच प्रयत्नात इतका मोठा सन्मान मिळवल्यामुळे त्यांचे साहित्य क्षेत्रातील भविष्य उज्ज्वल असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या या यशाने कोकणच्या साहित्य परंपरेचा मान राज्य स्तरावर उंचावला आहे. सर्व साहित्यिक वर्तुळातून त्यांचे कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ, कार्यवाह विनीता रेणपुरे, सहकार्यवाह संजय जगताप आणि कोषाध्यक्ष विजय नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले…………………….




