
अभंग गायन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतसृष्टी तांबे, आदित्य लिमये, स्वरा भागवत विजेते
स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव; राज्यस्तरीय फेरी पावसला
रत्नागिरी : श्री स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद् संजीवनी गाथेतील अभंग गायन राज्यस्तरीय स्पर्धेची रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली. यामधून सृष्टी तांबे आणि आदित्य लिमये या दोघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस आणि स्वराभिषेक-रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्राथमिक फेरी येथील प.पू. गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर पार पडली. स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगांचा प्रचार आणि प्रसार सर्वदूर व्हावा या उद्देशाने ही राज्यस्तरीय स्पर्धा राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, अकोला, रत्नागिरी अशा सहा केंद्रांवर घेतली जाते. रत्नागिरीतील केंद्रावर एकूण २८ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून सृष्टी हेमंत तांबे हिने प्रथम, आदित्य आनंद लिमये याने द्वितीय, तर स्वरा अमित भागवत हिने तृतीय क्रमांक पटकावला. त्यापैकी सृष्टी आणि आदित्य हे दोघे पावस येथे स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मसोहळ्यादरम्यान होणाऱ्या अंतिम फेरीत दाखल झाले. स्पर्धेचे परीक्षण गोवा येथील प्रसिद्ध गायक सचिन तेली आणि ज्येष्ठ तबलावादक अमित भोसले यांनी केले, तर साथसंगत केदार लिंगायत, पुष्कर सरपोतदार (तबलासाथ), मंगेश मोरे, महेश दामले, चैतन्य पटवर्धन (संवादिनीसाथ), अद्वैत मोरे, विश्वास सनगरे (तालवाद्य) यांनी केली. एस कुमार साऊंडचे उदयराज सावंत यांनी ध्वनिसंयोजन केले. प्राथमिक फेरीतील विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. गगनगिरी महाराज आश्रमाचे व्यवस्थापक राम पानगले आणि त्यांच्या सहकाऱ्याचे स्पर्धेकरिता विशेष सहकार्य लाभले. श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे जयंतराव देसाई यांच्यासह स्वामिभक्त रसिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेची अंतिम फेरी स्वामींच्या जन्मोत्सवादरम्यान १२ डिसेंबरला पावस येथे समाधी मंदिरात होणार असून यामध्ये एकूण सहा केंद्रांवरील १२ विजेते स्पर्धक सहभागी होणार आहेत.




