
संजय राऊत यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या एका कारवर धमकी,संजय राऊतांच्या घरी बॉम्ब शोधक पथक आणि मुंबई पोलीस दाखल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालं आहे. मुंबई पोलिसांचं एक पथक देखील संजय राऊत यांच्या घरी दाखल झालं आहे. विशेष म्हणजे मुंबईत सध्या महापालिका निवडणुकांचं वातावरण आहे. असं असताना संजय राऊत यांच्या घराबाहेर बॉम्ब से उडा दूंगा अशी धमकी एका गाडीवर लिहिण्यात आली होती. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर आता यंत्रणा सतर्क झाले आहेत. संपूर्ण घर, आणि घराबाहेरचा आसपासच्या परिसराची तपासणी केली जात आहे.
संजय राऊत यांच्या निवासस्थानातील कर्मचारी आणि कुटुंबियांनी याबाबतची माहिती राऊतांचे बंधू सुनील राऊत यांना दिली. सुनील राऊत हे त्या भागाचे विद्यमान आमदार आहेत. तसेच याबाबत पोलिसांनादेखील माहिती देण्यात आली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीसही सतर्क झाले. पोलिसांनी तातडीने संजय राऊत यांच्या घराच्या दिशेला धाव घेतली. तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक देखील तिथे दाखल झालं. या प्रकरणात आता सविस्तर तपास केला जात आहे.
नेमकी धमकी काय देण्यात आली?
संजय राऊत यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या एका कारवर ही धमकी देण्यात आली. या कारच्या काचेवर असणाऱ्या धुळीवर हाताने लिहिण्यात आलं आहे. यामध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. हिंदी भाषेत ही धमकी देण्यात आली आहे. “आज हंगामा होगा. आज रात बारा बजे बॉम्ब ब्लास्ट होगा”, अशी धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नववर्षाला सुरुवात होणार आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. असं असताना अशाप्रकारची धमकी देण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
दरम्यान, आता या प्रकरणात तपासातून काय माहिती समोर येते? ते पाहणं महत्त्वाचं आहे. तपास यंत्रणांकडून संजय राऊत यांच्या घरातही शोध घेतला जात आहे. तसेच घराचा परिसर आणि घराच्या आजूबाजूच्या परिसरातही शोध घेतला जात आहे. कुठलीही संशयास्पद वस्तू नाही ना? याचा तपास केला जात आहे.हा प्रकार खरंच गंभीर धमकीचा आहे की कुणी खोडसाळपणा केला आहे? हे आता तपासातून स्पष्ट होईल. पोलीस याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊ शकतात.




