
विरोधी पक्षनेता नाही तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा! उद्धव ठाकरे यांची मागणी!
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते नेमलेले, नाहीत. लोकशाहीसाठी हे अत्यंत धोकादायक आहे. एवढे मजबूत सरकार असूनही विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती केलेली नाही. सरकार नक्की कोणाला अन् का घाबरत आहे, असा सवाल करताना जर विरोधी पक्षनेतेपदासाठी कायदे दाखवणार असाल तर संविधानात तरतूद नसलेले उपमुख्यमंत्रीपदही तात्काळ रद्द करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
पुण्यातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मातोश्री येथे पक्षप्रमुख ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले, भाजप माथाडी पुणे शहराध्यक्ष अक्षय भोसले आणि मातंग एकता आंदोलनाच्या आरती मिसाळ, क्रांतीवीर झोपडपट्टी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश परदेशी’ छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. गेल्या वर्षभरात सरकारने जाहिरातींशिवाय काही काम केले नाही. दुसरीकडे दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते नेमलेले, नाहीत. लोकशाहीसाठी हे अत्यंत धोकादायक असल्याचे ते म्हणाले.
महायुतीमधील तीनही पक्षाचे नेते एकच आहेत. तिन्ही पक्षाचे चिन्ह, नाव, वेगवेगळे असले तरी त्यांचा मालक एकच आहे. त्यांच्या (भाजपा) या बी टीम आहेत. मी काही दिवसांपूर्वी एक शब्द वापरला होता की अॅनाकोंडा. आता या अॅनाकोंडाचा प्रत्यय महायुतीमधील पक्षांना यायला लागलेला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना अॅनाकोंडा गिळल्याशिवाय राहणार नाही”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मतदार यादीतील घोळांकडे न्यायालयाने लक्ष द्यावे
राज्यात नगरपरिषदा, नगरपंचायत, जिल्हा परिषद, महापालिका या सगळ्या निवडणुकीत गडबड घोटाळे सुरू आहेत. मतदारयादींमध्ये प्रचंड गोंधळ असून त्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश दिले आहेत. मात्र मतदारयादीतील त्रुटींवर कोणीच बोलत नाही. भटक्या कुत्र्यांबाबत न्यायालयाने ज्या पद्धतीने तातडीने दखल घेतली, त्याच प्रकारे या घोळाकडे स्वतःहून लक्ष द्यावे. अन्यथा जोपर्यंत मतदारयादींचे शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
सत्ताधाऱ्यांमध्ये आता हाणामारी सुरू आहे. महाराष्ट्रातील राजकारण आताच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्णतः गढूळ करून टाकले आहे. पूर्वी इतर राज्यात ही परिस्थिती होती. आता महाराष्ट्रात हा प्रकार सुरू झाला आहे. बुथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा उद्योग सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचा सत्ता पिपासूपणा जनतेच्या हिताचा नाही, असे ठाकरे म्हणाले.




