
रुपया पुन्हा तळाला, प्रतिडॉलर ९०.३३ च्या नीचांकी पातळीवर
मुंबई : भारत-अमेरिका व्यापार करारावरील अनिश्चिततेमुळे गुरुवारी रुपया ३९ पैशांनी घसरून ९०.३३ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला.दोन्ही देशांमधील व्यापार करारातील विलंबामुळे गुंतवणूकदारांमधील अस्वस्थता वाढली आहे, त्यामुळे रुपया नकारात्मक व्यवहार करण्याची अपेक्षा आहे, असे परकीय चलन व्यापाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. पुढील वर्षात मार्चपर्यंत व्यापार करार होण्याची शक्यता व्यक्त मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी व्यक्त केली. तरी त्याचा अपेक्षित परिणाम होण्याऐवजी, त्यांच्या विधानानंतर रुपया ९०.४८ या नवीन नीचांकी पातळीवर गडगडला.
परकीय चलन बाजारात, रुपयाने ८९.९५ या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. नंतर तो आणखी घसरून, ९०.४८ या विक्रमी नीचांकी पातळीवर गडगडला. मागील बंदपेक्षा त्याने ५४ पैशांची गटांगळी दाखविली. बुधवारी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी घसरून ८९.९४ वर बंद झाला होता.
व्यापार करारासंबंधाने अनिश्चिततेमुळे भारतीय रुपयाने नवीन नीचांकी पातळी गाठली. तथापि, सकारात्मक देशांतर्गत बाजारपेठ आणि इतर चलनांच्या तुलनेत कमजोर बनलेल्या अमेरिकी डॉलरमुळे अधिक मोठ्या घसरणीतून सावरण्यास रुपयाला मदत झाली. शिवाय मध्यवर्ती बँकेच्या हस्तक्षेपामुळे रुपयाला खालच्या पातळीवरही आधार मिळू शकला, असे मिरॅ ॲसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी म्हणाले. रुपया प्रति डॉलर ९०.१० ते ९०.७५ च्या श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे, असेही चौधरी पुढे म्हणाले.



