
रायपाटण-ओणी मार्गावरील खड्डे कोणत्या मुहूर्तावर बुजावणार?
संतप्त नागरिकांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला सवाल
राजापूर : तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावर काही परिसरातील पडलेले खड्डे बुजविण्यात आले असले, तरी रायपाटणपासून ओणीपर्यंत असलेले खड्डे बुजविण्याचे काम अद्याप सुरू न झाल्याने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग मुहूर्त शोधतोय काय? असा खोचक सवाल आता जनमानसातून विचारला जात आहे.
पडलेले खड्डे दिवसेंदिवस अधिकच रुंदावत असून खड्ड्याचा त्रास आणि उसळणारी धुळ अशा दुहेरी संकटाचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागत आहे. ओणी-अणुस्कुरा मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावेत, अशी मागणी करणारे निवेदन काही दिवसांपूर्वी पूर्व परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते; मात्र अणुस्कुरा घाटापासून पाचलपर्यंतचे खड्डे बुजवण्यात आले. त्यानंतर रायपाटणपासून ओणीपर्यंतचे खड्डे तसेच असून ते बुजवण्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही हे वास्तव पुढे आले आहे.
या संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामध्ये रायपाटण, विरभद्र मंदिरापासून येळवण थांबा, कोळवणखडी घाटीपासून पेट्रोलपंप (कोळवणखडी), कोळवणखडी थांब्यापासून पुढील काही भाग, सौंदळ हायस्कूलपासून पाटीलवाडी रेल्वेस्थानकपर्यंतचा परिसर, दैतवाडीचा परिसर, या भागात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
सुरवातीला रस्त्यात खड्डे पडले होते. आता हे खड्डे पाहता रस्ता खड्ड्यात गेला असे म्हणण्याची वेळी प्रवाशांसह वाहन चालकांवर आली आहे. वाहनचालकांना वाहने हाकताना कसरत करावी लागत असतानाच उसळणाऱ्या धुळीमुळे तर आणखी त्रास होत आहे.
संपूर्ण मार्ग खड्डेमय बनला असताना हे खड्डे नेमके कोणत्या मुहूर्तावर बुजवणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.




