राजापूर तालुक्यात भालावली गावात युवतीच्या खून प्रकरणातील आरोपीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली


राजापूर तालुक्यात भालावली गावात जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या युवतीच्या खून प्रकरणातील आरोपी विनायक शंकर गुरव याला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.भालावली गावातील दोन महाविद्यालयीन युवतींवर लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.या हल्ल्यात साक्षी गुरव या युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर दुसरी युवती गंभीर जखमी झाली होती.
ही घटना १८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भालावली येथील वरी गुरववाडी परिसरात घडली होती. गावात सुतक-सुवेर पाळणे आणि गावदेवतेच्या दास्तानाच्या हक्कावरून दोन गटांत तीव्र वाद निर्माण झाला होता. या धार्मिक वादातूनच या प्रकरणाला हिंसक वळण लागले, असे तपासात स्पष्ट झाले.
या घटनेच्या दिवशी मयूर गुरव यांची बहीण साक्षी गुरव आणि शेजारील मुलगी सिद्धी संजय गुरव या दोघी महाविद्यालयातून पायी घरी परतत असताना विनायक गुरव याने रस्त्यात अडवून संतोष गुरव यांच्या आंबा बागेजवळ लाकडी दांड्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. ‘तुमचे खानदान संपवून टाकीन,’ अशी धमकी देत त्याने दोघींच्या डोके व मानेवर जोरदार वार केले. या हल्ल्यात दोन्ही युवती गंभीर जखमी झाल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोघींना धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच साक्षी गुरव हिला मृत घोषित करण्यात आले.
या प्रकरणी मयूर गुरव यांनी राजापूर-नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भादंवि कलम ३०२, ३२६, ५०६ आणि २०१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी नाटे पीलीस स्थानकाचे तत्कालीने सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी आबासाहेब पाटील यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. अनाद्र फणसेकर यांनी यशस्वीपणे बाजू मांडली. एकूण १४ साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी विनायक शंकर गुरव याला खून, प्राणघातक हल्ला, धमकी आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button