रत्नागिरी जिल्ह्यातून तीन सराईत गुन्हेगार तडीपार


रत्नागिरी : जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली असून रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांवर चार जिल्ह्यांतून, तर लांजा पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्हेगारावर रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरोधात ठोस व परिणामकारक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील सलमान उर्फ आकाश अशोक डांगे आणि आमिर नजिर मुजावर यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सलमान उर्फ आकाश डांगे (रा. साईश्वरी अपार्टमेंट वॉचमन रूम, थिबा पॅलेस, माळनाका, रत्नागिरी) याच्यावर शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे तसेच अमली पदार्थ विक्रीसंबंधी गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कारवायांमुळे शहरातील तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आले होते. तर आमिर नजिर मुजावर (रा. घर नं. १३८५, राजीवडा नाका, रत्नागिरी) याच्यावर शरीराविरुद्ध व महिलांविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल असून त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. दोघांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे रत्नागिरी शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६ (१)(अ)अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर व पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांनी सलमान उर्फ आकाश डांगे व आमिर नजिर मुजावर यांना रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड व कोल्हापूर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, लांजा पोलीस ठाणे हद्दीतील शिपोशी हनुमानवाडी येथील सराईत गुन्हेगार गुरुनाथ यशवंत तावडे (रा. शिपोशी, हनुमान वाडी, ता. लांजा) याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. तावडे याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ तसेच भा. दं. वि. संहिता कलम ४५७ व ३८० अन्वये गंभीर गुन्हे दाखल आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, राजापूर यांनी गुरुनाथ यशवंत तावडे याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१)(अ) अन्वये रत्नागिरी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button