मुंबईत भाजप १३७ तर शिवसेना ९० जागा लढणार!


मुंबई : मुंबईत भाजप १३७ तर शिवसेना ९० जागा लढविणार आहे. भाजप-शिवसेनेत जोरदार खेचाखेची झाल्यावर जागावाटपाचे सूत्र अखेर निश्चित करण्यात आले. दोन्ही पक्ष आपल्या कोट्यातून मित्रपक्षांना जागा देणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९५-१०० जागांचा आग्रह धरला होता, तर भाजपने १४० जागा लढविण्याचा निश्चय केला होता. पण दोघांनीही अखेर तडजोड करीत जागावाटपावर शिक्कामोर्तब केले. भाजप रिपब्लिकन पक्षाला (रामदास आठवले) आपल्या कोट्यातून तीन-चार जागा देणार असून हे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावरच निवडणूक लढवितील.

युतीच्या जागावाटपाचा अखेरच्या क्षणापर्यंत गोंधळ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०० जागांचा आग्रह धरल्याने भाजप-शिवसेना युतीचे जागावाटप १५-२० जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत रखडले आणि गोंधळ कायम राहिला. शिवसेनेने अडवणूक केल्याने आणि भाजपला अनेक भागांमध्ये पुरेशा जागा न दिल्याने भाजपमध्ये असंतोष आहे. त्याचबरोबर भाजपच्या निष्ठावंताना डावलून पक्षात नव्याने आलेल्यांना संधी मिळाल्याने तीव्र नाराजी आहे. बंडखोरीच्या भीतीने भाजपने अधिकृतपणे उमेदवार यादी घोषित केली नसून सोमवारी रात्रीपर्यंत ११५ हून अधिक उमेदवारांना एबी अर्ज वाटप केल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजप-शिवसेना जागावाटप चर्चेचे गुऱ्हाळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सुरु राहिले. भाजपने शिवसेनेला ८७ जागा देण्याची तयारी दाखविली. मात्र गेल्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या ८४ जागांसह १०० जागांचा आग्रह शिंदे यांनी धरला. त्यामुळे भाजप निवडणूक प्रभारी ॲड. आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष अमित साटम आदी नेत्यांनी शिंदे यांच्यासह शिवसेना नेत्यांशी सोमवारी दिवसभरात अनेकदा चर्चा केली. भाजपला रिपब्लिकन पक्षासाठी (रामदास आठवले) काही जागा सोडायच्या असून किमान १४० जागा लढविण्याचे उद्दिष्ट होते. पण शिवसेनेने अधिक जागांचा आग्रह धरल्याने भाजपला माघार घेत १३७ जागांवर समाधान मानावे लागले. शिंदे यांनी १०० जागांचा आग्रह धरला, तरी त्यांनाही ९० जागांवर तडजोड करावी लागली.

भाजपचे उमेदवार शिंदे स्वीकारणार?

शिंदे यांना ९२-९५ जागा देण्यासाठी भाजपने आपले चार-पाच उमेदवार शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर लढतील, असा प्रस्ताव दिला आहे. पण शिवसेनेतही इच्छुकांची संख्या मोठी असल्याने भाजपमधून उमेदवार आयात करण्यास शिंदे यांनी नकार दिला. शिंदे यांनी अनेक माजी नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला असून त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे शिंदे हे अधिक जागांसाठी आग्रही होते. त्यांनी १२५ जागांची मागणी केली होती. पण अखेर ९० जागा स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. उद्धव ठाकरे यांची सत्ता मुंबई महापालिकेतून हद्दपार करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत शिंदे यांच्याशी तडजोड करून युती करण्याचे पक्षश्रेष्ठींचे निर्देश आहेत. त्यामुळे शिंदे यांचा जागांचा आग्रह मान्य करण्याशिवाय भाजपपुढे अन्य पर्याय नाही. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी, असे अनेक नेते व कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुकांना संधीही मिळेल. पण युती करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याने जागावाटपात भाजपला माघार घ्यावी लागली आणि शिंदे यांचा आग्रह काही प्रमाणात मान्य करावा लागला. अखेर फडणवीस आणि शिंदे यांच्यात बोलणे झाल्यावर १३७ आणि ९० जागांच्या सूत्रावर शिक्कामोर्तब झाले.

भाजपमध्ये असंतोष

युती करण्याचे आदेश असल्याने भाजपमधील इच्छुकांना संधी मिळणे कठीण आहे. शिवसेनेने वरळी, माहीम, दादर, भायखळा, परळ या मराठी पट्ट्यात भाजपला एखादीच जागा दिली आहे. या परिसरातील अनेक जागा शिवसेना लढणार असून भाजपची ताकद तेथे असूनही त्याचा फायदा मात्र शिवसेनेला मिळणार आहे. वरिष्ठ नेते जागावाटपात शिवसेनेला झुकते माप देत असल्याने भाजपमध्ये तीव्र असंतोष आहे. भाजपने ११५ हून अधिक उमेदवारांना रात्रीपर्यंत एबी अर्ज दिले. त्यात भाजपमधील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे प्रमाण कमी असून पक्षात नव्यानेच किंवा दोन-चार वर्षात दाखल झालेल्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button