गुहागर नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपदासह ४३ जणांचे भवितव्य मतपेटीत बंद

गुहागरमध्ये ७५.२६ टक्के मतदान : भाजप- शिवसेनेकडून विजयाचा जल्लोष साजरा

गुहागर : नगरपंचायतीसाठी काल (२ डिसेंबर) झालेल्या निवडणुकीत नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ३९ उमेदवार, तर नगराध्यक्ष पदासाठी ४ उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले आहे. दरम्यान, निवडणूक संपल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता महायुतीतर्फे गुहागर नाका येथे फटाक्यांची आतिषबाजी करून भाजप-शिवसेनेच्या घोषणा देत एकमेकांना पेढे भरवून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.

शहरात एकूण ५,९६१ मतदार असून, यामध्ये पुरुष २,८५६, तर ३, १०५ स्त्री मतदार आहेत. सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी नसली, तरी सतत मतदार येत होते. सकाळी ७.३० ते ९.३० या कालावधीत २३.३७ टक्के, ११.३० वाजता ४६.४७ टक्के, दुपारी १.३० पर्यंत ६१.२८ टक्के तर दुपारी ३.३० पर्यंत ६९.१२ टक्के मतदान झाले होते. गुहागर नगरपंचायतीतील एकूण मतदारांपैकी ४,४८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ७५.२६ टक्के मतदान झाले.
सर्व मतदार केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. प्रभाग क्रमांक ११ चे मतदान केंद्र खरे-ढेरे कॉलेजमध्ये होते. हे मतदान केंद्र बरेच वर असल्यामुळे तसेच वृद्ध मतदारांना खासगी गाडी केंद्रापर्यंत नेण्यासाठी परवानगी नसल्यामुळे अडचणीचे होत होते. कार्यकर्त्यांनी गाडीवर नेण्यास परवानगी मागितली; मात्र खासगी गाडी नेण्यास परवानगी दिली नाही.
असे असले तरी तिथून पुढे नेण्यासाठी तीन गाड्यांची व्यवस्था केली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मतदानासाठी एकूण १७ मतदान केंद्र होती. यामध्ये आदर्श मतदान केंद्र, सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. प्रत्येक केंद्रावर १ केंद्राध्यक्ष ३ मतदान अधिकारी आणि १चतुर्थ श्रेणी कर्मचारी असे ५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. यासाठी एकूण २५० कर्मचाऱ्यांची या निवडणूक प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती.
प्रत्येक मतदानक केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर वाहन उभे करण्यास मनाई करण्यात आली होती. गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यासाठी २ अधिकारी, १५ अंमलदार, एसआरपीएफ ३ अधिकारी, ७० अंमलदार आरसीपी प्लॅटूनचे १ अधिकारी, ३० अंमलदार व ४० होमगार्ड तैनात ठेवण्यात आले होते.
निवडणूक संपल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता भाजप-शिवसेनेच्या वतीने गुहागर नाक्यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून घोषणा देत एकमेकांना पेढे भरवून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.
यामध्ये माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप जिल्हाप्रमुख सतीश मोरे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, सुरेश सावंत, भाजप जिल्हा सरचिटणीस नीलेश सुर्वे, भाजप गुहागर तालुका अध्यक्ष अभय भाटकर, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नीता मालप व सर्व उमेदवार सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button