
कृषी पंपाच्या संदर्भातील प्रश्नांबाबत ऍड. ज्ञानेश खोतकर यांचे कोकणातील मंत्र्यांना पत्र
कोकण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, भाजपचे कृषी क्षेत्रातील नेतृत्व आणि किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड. ज्ञानेश पोतकर यांनी कोकणातील शेतकर्यांचे कृषी पंपांच्या संदर्भातील ज्वलंत प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात तातडीने मांडण्यासाठी कोकणातील मंत्री आणि आमदारांना निवेदन दिले आहे.
संपूर्ण राज्याचे कृषी पंप वीजबिल माफ करण्याच्या ऐतिहासिक कार्यात त्यांनी अभ्यासपूर्ण बाजू मांडली होती. त्याच अनुषंगाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकर्यांच्या समस्या त्यांनी लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणल्या आहेत. शेतकर्यांच्या तीन प्रमुख मागण्यांवर लक्ष केंद्रित करताना ऍड. ज्ञानेश पोतकर यांनी मंत्री उदय सामंत व नीतेश राणे, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह आमदार भास्कर जाधव, नीलेश राणे, किरण सामंत, शेखर निकम तसेच विधानपरिषद आमदार प्रसाद लाड, निरंजन डावखरे, योगेश टिळेकर, विक्रांत पाटील आणि सत्यजित तांबे यांना निवेदन देऊन पुढील तीन बाबींवर तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
व्होल्टेज कमी असल्यामुळे अनेकदा कृषी पंप विहिरीतून पाणी खेचत नाहीत, परिणामी शेतीला पाणी मिळत नाही. सिंगल फेजचे कृषी पंप कनेक्शन थ्री फेजमध्ये रूपांतरित करण्याची शेतकर्यांची मागणी महावितरणचे अधिकारी धुडकावून लावत आहेत. ऊर्जामंत्री विभागाने ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक बंद केल्यामुळे शेतकर्यांना अर्ज करता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन लिंक तातडीने खुली करून ’मागेल त्याला थ्री फेज कनेक्शन’ देण्यात यावे. ’मागेल त्याला सौर पंप’ या योजनेत शेतकर्यांनी सौर पंपांची मागणी केल्यास, महावितरणचे अधिकारी ते धुडकावून लावत आहेत. शेतकर्यांकडे सिंगल फेज कृषी पंप असल्यामुळे त्यांना सौर पंप देता येणार नाही, असे कारण देत अधिकारी मागणी फेटाळत आहेत, ज्या शेतकर्यांना विद्युत पंपासोबत सौर पंप हवा आहे, त्यांना ते तातडीने उपलब्ध करून देण्यात यावेत. मत्स्य शेतीला ’कृषी’ चा दर्जा मिळालेला असतानाही, कृत्रिम मत्स्य शेती म्हणजेच कोळंबी प्रकल्प यांसारख्या प्रकल्पांना व्यावसायिक किंवा औद्योगिक दराने वीजपुरवठा केला जातो. हा दर बदलून मत्स्य शेतीला ’कृषी’ च्या कमी दराने वीजपुरवठा करावा आणि या प्रकल्पांनाही सौर ऊर्जेच्या विविध योजना लागू करण्यात याव्यात. विधिमंडळ अधिवेशनात मंत्री आणि लोकप्रतिनिधी संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून कोकणातील शेतकर्यांना लवकरात लवकर दिलासा देतील, अशी आशा ऍड. ज्ञानेश पोतकर आणि त्यांचे सहकारी सुशांत पाटकर यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com




