कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे हर्णैजेटीचे काम रखडले.

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे मासळी बंदर असलेल्या हर्णै बंदरात सुसज्ज जेटी बांधण्याच्या तब्बल ४० वर्षांच्या मागणीला शासनाने मंजुरी दिल्यानंतर जेटी कामाच्या प्राथमिक कामाला सुरवात झाली. त्यामुळे मच्छीमारांमध्ये आशादायी वातावरण निर्माण झाले होते; मात्र पाच महिने काम झाल्यानंतर पावसाळ्यामुळे हे काम बंद होते. आता डिसेंबर महिना आला तरी या जेटी चे काम सुरू झाले नसल्यामुळे येथील मच्छीमारांच्या पदरी निराशाच पडली आहे. कंत्राटदाराच्या नियोजनशून्यते मुळेच हे काम रखडल्याची चर्चा हर्णैमध्ये सुरू असून, मेरी टाईम बोर्डाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी येथील मच्छिमार करत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे मासेमारी बंदर म्हणून हर्णै बंदर ओळखले जाते. साधारण ७०० ते ८०० यांत्रिक नौका,१०० च्या वर आउटबोर्ड इंजिन वाल्या होड्या या बंदरात मासळी उतरतात. निर्यातयोग्य कोळंबी ही येथील मुख्य मासळी समजली जाते. सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या ताज्या मासळीच्या लिलावामुळे येथे मोठी उलाढाल होत असते; मात्र गेल्या ४० वर्षांपासून येथे जेटीसाठी होत असलेल्या मागणीकडे कायम दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे येथील नौका आपत्तीप्रसंगी आंजर्ले, दाभोळ, जयगड खाडीत ठेवाव्या लागतात. त्यातच जेटी अभावी खलाशी वर्गाला पाण्यात उतरून मासळी किनाऱ्यावर आणावी लागते. परिणामी व्यवसायात खलाशी वर्ग उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक वेळा बोटी बंद ठेवाव्या लागत असल्याने मोठे नुकसान होते. दरम्यान हर्णै जेटीसाठी सुमारे २५० कोटींच्या कामाला मागील वर्षी मंजुरी मिळाली. त्यानंतर या कामाला सुरवात करण्यात आली; मात्र त्यानंतर पावसाळ्यामुळे थांबवलेले काम डिसेंबर उजाडला तरी सुरू झालेले नाही. त्यामुळे
येथील मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांच्या या प्रश्नावर चालू अधिवेशनात चर्चा होऊन विनाकारण जेटी कामाला विलंब करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.

हर्णै बंदरातील जेटीला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांनी शासनाचे आभार मानले आहेत. दरम्यान जेटीसाठी बंधारा पद्धतीचे काम अगदीच किनाऱ्यालगत झाले असून किनाऱ्यावर चिखल साचू लागला आहे. आता वेळेत जेटी कामाला सुरुवात झाली नाही तर किनाऱ्यावर बोटी आणणे जिकिरीचे होऊन येथील मत्स्य उद्योग अडचणीत सापडेल. त्यामुळे मेरी टाईम बोर्डाने तत्काळ जागेची पाहणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

  • प्रकाश रघुवीर
    उपाध्यक्ष, हर्णै बंदर संघर्ष समिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button