
ओणी-अणुस्कुरा मार्गावरील खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी
राजापूर : तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावर मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांसह वाहन चालकांना आतोनात त्रास होत असून अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने आठ दिवसांत मार्गांवरील खड्डे बुजवून संपूर्ण मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशारा तालुक्याच्या पूर्व परिसरवासीय ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन राजापूर बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.
तालुक्यातील ओणी- अणुस्कुरा हा १५० क्रमांक राज्य मार्ग असून गेल्या काही महिन्यांपासून त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे बहुतांशी मार्गाची चाळण झाली आहे. सुरवातीच्या काळात रस्त्यावर खड्डे असे चित्र होते. आता तर ओणीपासून पाचलपर्यंत विविध ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने आता खड्ड्यात रस्त्या असे स्वरूप प्राप्त झाले आहे.
यामध्ये प्रामुख्याने ओणी दैतवाडी परिसर, सौंदळ पाटीलवाडीचा भाग, सौंदळ बाजारपेठ, कोळवणखडी, येळवण, रायपाटण, पाचल आदी भागात तर संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाचलपासून अणुस्कुरा घाटापर्यंत पडलेले खड्डे पॅच मारून बुजविले आहेत; मात्र बहुतांश भागातील खड्डे नेमके केव्हा बुजविले जाणार याबाबत निश्चिती नसल्याने या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह इतर वाहन चालकांना आतोनात त्रास होत आहे. कोणता खड्डा चुकवायचा असाच प्रश्न त्यांच्या समोर ठाकला आहे. एवढी विदारक स्थिती या रस्त्याची बनली आहे.
गेली चार-पाच वर्षे ओणी – अणुस्कुरा मार्गावरील वाहतूक प्रचंड वाढली आहे. अहोरात्र या मार्गावर कायम वर्दळ सुरू असते. बहुतांशी भाग खड्डेमय बनल्याने प्रवाशांसह वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतेय. तालुक्याच्या पूर्व परिसराला जोडणारा हा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. आजूबाजूच्या गावांमधील विद्यार्थी रायपाटण, पाचल,ओणी, राजापूरसह लांजा येथे शिक्षणासाठी नित्य ये- जा करीत असतात. सर्व प्रकारचे खरेदीदार पाचल, ओणीकडे ये जा करीत असतात. दर बुधवारी पाचलचा तर रविवारी सौंदळचा बाजार असतो. तसाच बाजार ओझर येथे देखील भरतो. परिसरातील खरेदीसाठी जात असतात. एखाद्या अत्यावस्थ रुग्णाला अधिक उपचारार्थ सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई कडे नेताना त्या रुग्णाला या खड्ड्यामुळे अधिक त्रास होतो. यापूर्वी खड्ड्यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत.
या निवेदनात आणखी अपघात होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले आणि ओणी – अणूस्कुरा मार्गावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवून संपूर्ण मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे. पुढील आठ दिवसांत जर पडलेले खड्डे बुझविले गेले नाहीत तर आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा निर्वाणीचा इशारा त्या निवेदनात देण्यात आला आहे. ओणी अनुस्कुरा मार्गाची देखभाल पहाणारे अधिकारी स्वप्नील बावधनकर यांनी ते निवेदन स्वीकारले. याप्रसंगी अरविंद लांजेकर, प्रसाद पळसुलेदेसाई, प्रकाश पाताडे, संदेश आंबेकर, राजेश खानविलकर, चंद्रकांत कानेटकर आदी उपस्थित होते.




