
प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनामतदान गोपनीयतेच्या हक्काचे उल्लंघन होता कामा नयेछायाचित्र, छायचित्रण पुरेशा अंतरावरुन करणे बंधनकारक
रत्नागिरी, दि. 28 :- मतदान व मतमोजणी केंद्रावरील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी दक्षता घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रात सूचना दिल्या आहेत. कुठल्याही मतदान केंद्रावर किंवा मतमोजणी केंद्रावर प्रवेशिकेशिवाय प्रवेश करता येणार नाही. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट मतदान केंद्रावरील मतदान कक्षाजवळ जाऊन पहाणी किंवा छायाचित्रे, छायाचित्रण करता येणार नाही. मतदार मतदान करतानाचे छायाचित्र किंवा छायाचित्रण पुरेशा अंतरावरुन करणे बंधनकारक असेल. ते करतानाही मतदानाच्या गोपनीयतेच्या हक्काचे उल्लघंन होता कामा नये.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी दिलेली प्रवेशिका रद्द करण्याचे अधिकार यथास्थिती संबंधित जिल्हाधिकारी अथवा निवडणूक निर्णय अधिकारी अथवा राज्य निवडणूक अधिकाऱ्यांस असतील. मतदान व मतमोजणी केंद्रावरील संबंधित अधिकारी/ कर्मचारी प्रवेशिकेची उचित पडताळणी करुनच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान/मतमोजणी केंद्रावर प्रवेश देतील. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना थेट मतदान केंद्रावरील मतदान कक्षाजवळ जाऊन पाहणी किंवा छायाचित्रण करता येणार नाही; तसेच मतदान कक्षाचे छायाचित्रेही घेता येणार नाही. शांततापूर्ण व शिस्तबद्ध मतदान प्रक्रियेत बाधा पोहचेल, असे कुठलेही वर्तन करता कामा नये. मतदार मतदान करतानाचे छायाचित्र किंवा छायाचित्रण पुरेशा अंतरावरून करणे बंधनकारक असेल. ते करतानाही मतदानाच्या गोपनियतेच्या हक्काचे उल्लंघन होता कामा नये.
कुठल्या मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केले आहे, हे मतदानाच्या वेळी किंवा मतमोजणीप्रसंगी अपघाताने चित्रित झाल्यास किंवा त्याचे छायाचित्र काढल्यास त्याचे प्रसारण किंवा प्रसिद्धी करता येणार नाही. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान / मतमोजणी केंद्रावर छायाचित्रासाठी किंवा छायाचित्रणासाठी कॅमेराचे स्टँड नेता येणार नाही. राज्य निवडणूक आयोग / संबंधित जिल्हाधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी नेमलेला अधिकृत छायाचित्रकार किंवा कॅमेरामन यांनाच मतदान केंद्रात व मतमोजणी केंद्रात कॅमेराचे स्टँड नेता येईल. मतदान किंवा मतमोजणी केंद्रावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची एकाच वेळी होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार गटागटाने सर्वांना आत सोडण्याबाबतचे किंवा परिस्थितीनुरुप नियोजन करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी किंवा मतदान केंद्राध्यक्ष यांना असतील.
000




