राजापूर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम

राजापूर : नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान होत असून, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती राजापूर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांनी दिली आहे.
शहरातील दहा प्रभागांतील दहा मतदान केंद्रावर प्रत्येक मतदान केंद्रावर सहा या प्रमाणे ६० कर्मचारी नियुक्त केले जाणार असून, आवश्यक तिथे पोलीस कर्मचारीही तैनात केले जातील, असे त्यांनी सांगितले.
शहरातील गोखले कन्या शाळा व विश्वनाथ विद्यालय या दोन मतदान केंद्रावर एक पिंक मतदान केंद्र (सर्व महिला कर्मचारी असलेले) व एक आदर्श मतदान केंद्र (आकर्षक सजावट असलेले) अशी दोन विशेष मतदान केंद्र असणार आहेत.
राजापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एक लोकनियुक्त नगराध्यक्ष व दहा प्रभागांतील २० नगरसेवक पदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. यासाठी शहरातील दहा प्रभागात दहा मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन निवडणूक मतदान कर्मचारी, एक पोलीस कर्मचारी व एक शिपाई असे एकूण सहा कर्मचारी असणार आहेत. तर काही ठिकाणी राखीव कर्मचारीही असणार आहेत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.
निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. यापूर्वी पथनाट्य सादर केले असून, उद्या (२७ नोव्हेंबर) शहरातील राजापूर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी शहरात प्रभात फेरी काढून मतदानाबाबत जनजागृती करणार आहेत. तसेच पथनाटयाद्वारेही जनजागृती केली जाणार असल्याचे गंबरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button