
पदाचा गैरवापर केल्याच्या गुन्ह्यातून तलाठी महिलेची निर्दोष मुक्तता
आबलोली (संदेश कदम) : स्वतः तलाठी आल्याचा गैरफायदा घेऊन शेतकरी आहे असे भासवण्यासाठी खोटा सात बारा उतारा तयार करून आणि तो उतारा दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखतासाठी वापरल्याच्या गुन्ह्यातून गुहागर न्यायालयाने तलाठी महिलेची निर्दोष मुक्तता केली. ही घटना सन २०१७ सालामध्ये गुहागर येथे घडली होती. सुमारे ७ वर्ष हा खटला गुहागर न्यायालयात सुरू होता. सरकारी कर्मचाऱ्याने अशा प्रकारचे कृत्य केले असल्याने सामान्य नागरिकांसोबतच शासकीय अधिकाऱ्यांचे देखील या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुहागर तालुक्यातील माळन या गावच्या तलाठी ही महिला कार्यरत होती. त्यावेळी त्यांच्याकडे पोमेंडी या गावाचा देखील अतिरिक्त पदभार देण्यात आला होता.
या तलाठी महिलेने त्यांच्या मैत्रिणी सोबत पोमेंडी या ठिकाणी एक शेतजमीन खरेदी करायची होती. शेत जमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी असणे आवश्यक होते. त्यांच्या मैत्रिणीकडे शेतकरी दाखला होता; परंतु या महिलेच्या नावाने अगर त्यांच्या वडिलांच्या नावाने शेतजमीन नसल्याने त्यांना शेतकरी दाखला मिळत नव्हता. तरीदेखील त्यांनी स्वतःच्या नावावर या जमिनीचे खरेदी खत नोंदवले. यांनी त्या खरेदीखतामध्ये स्वतःच्या नावावर बनावट सात बारा उतारा तयार करून जोडला आहे अशा आशयाची एक तक्रार तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली होती. त्या आधारे महसूल विभागाने चौकशी केली असता त्यामध्ये ही महिला तलाठी स्वतः शेतकरी असल्याचे भासवण्यासाठी संगणकीय सात बारा उताऱ्यात फेरफार करून चिपळूण येथील एका शेतजमिनीचा सात बारा उतारा स्वतःच्या नावे करून घेतल्याचे आणि तो सातबारा उतारा खरेदीखताला जोडला असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने गुहागरच्या तत्कालीन तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुहागर पोलीस ठाण्यात तलाठी महिलेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तलाठी महिलेने मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता.
गुहागर पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून असंख्य कागदोपत्री पुराव्यांसह तलाठी महिलेविरुद्ध गुहागर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
आरोपी तलाठी महिलेच्या वतीने निष्णात फौजदारी वकील संकेत साळवी यांनी संपूर्ण खटल्याचे कामकाज चालवले. सरकारी पक्षामार्फत या केसमध्ये एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये तहसीलदार, खरेदीखातामधील साक्षीदार, पोलीस अधिकारी आणि हस्ताक्षर तज्ञाचा अहवाल यांचा समावेश होता. आरोपी महिलेच्या वतीने ॲड. संकेत साळवी यांनी या सर्व साक्षीदारांचा उलट तपास घेतला. हस्ताक्षर तज्ञांच्या अहवालातील तांत्रिक चुका तसेच महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्राथमिक चौकशीत केलेल्या चुका आरोपीच्या वतीने न्यायालयासमोर मांडण्यात आल्या.
पोलीस अधिकारांच्या उलट तपासणीमध्ये तपासकामातील दोष समोर आणण्यात ॲड. संकेत साळवी हे यशस्वी ठरले. ॲड. साळवी यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये सरकारी पक्षाचे पुरावे निकामी ठरवून कायद्याच्या तरतुदी प्रभावीपणे मांडल्या. न्यायालयाने त्यांच्या निकालपत्रात ॲड. साळवी यांच्या वकिली कौशल्याचे विशेष कौतुक केले आहे.
२४ नोव्हेंबर रोजी गुहागर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी या खटल्याचा निकाल घोषित करून तलाठी महिलेची सर्व गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.




