
रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनात कवी संमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात झालेल्या कवी संमेलनाने अधिक रंगत आणली. कवी अरुण इंगवले, संगीता अरबुने, कैलास गांधी, राष्ट्रपाल सावंत, अभिजीत नांदगावकर आदी कवींनी दर्जेदार कविता सादर उपस्थितांची वाहवा मिळवली, तर कवी संमेलनाचे अध्यक्ष अनंत राऊत यांच्या सादरीकरणाने माहोल तयार झाला. “मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा” कवितेला उपस्थितांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले.

प्रारंभी अरुण इंगवले यांनी ‘कविता लिहिल्यासारख्या’ ही कविता सादर केली. त्यानंतर अभिजीत नांदगावकर यांनी गाऊन केलेल्या सादर केलेल्या “सावळी सावली घनात ओथंबून आली” कवितेला रसिकांचा प्रतिसाद मिळाला. अमृता नरसाळे यांनी “महाकाव्य”, राष्ट्रपाल सावंत यांनी ‘ज्ञानज्योती झालीस तू सावित्री माई’, दापोलीचे अशोक लोटणकर यांनी “सांज”, गझलकार कवी कैलास गांधी यांनी मतले, शेर, गझल सादर केली. संगीता अरबुने (मुंबई) यांनी “पुरुष” कविता सादर केली.
त्यानंतर रंगमंचाचा ताबा कवी अनंत राऊत यांनी घेतला आणि आपल्या मिश्किल शैलीने राजकीय, सामाजिक प्रश्नांवर कवितेच्या माध्यमातून यथेच्छ फटकेबाजी केली. त्यांनी सादर केलेल्या “बाई”, “शिक्षक”, “भोंगा”, “तो आणि ती” या कविता समाजातील वास्तव मांडणाऱ्या होत्या. तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना उद्देशून “सत्य मांड रं.. गड्या तू सत्य मांड रं…” ही कविता सादर केली.
अखेर त्यांनी सुरुवातीपासूनच उपस्थित रसिकांमधून वारंवार मागणी होत असलेली आणि अलीकडच्या काळात “व्हायरल” झालेली “मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा” ही कविता सादर केली.
रसिकांनी या सर्वच कवींना आणि त्यांनी सादर केलेल्या कवितांना तसेच यानंतर “कोकणचा साज, संगमेश्वरी बाज” या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.




