
दापोलीत शेतकरी हमीभावापासून वंचित राहणार, भात खरेदीसाठी गोडाऊनचा ताबा नाही
दापोली तालुक्यातील केळशी येथील शासकीय भात खरेदी केंद्रासाठी सरकारी गोडाऊनचा ताबा अजूनही केळशी परिसर आंबा उत्पादक संघाला मिळालेला नाही, यामुळे यंदा शेतकरी हमीभावापासून वंचित राहणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोडाऊनच्या ताब्यासाठी दरवर्षी होणार्या दिरंगाईमुळे शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित गोडाऊनची इमारत गेल्या चाळीस वर्षांपासून वापराविना पडून होती आणि काही लोक तिथे गुरे बांधत असत. शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन केळशी परिसर आंबा उत्पादक संघाने या गोडाऊनची मागणी केली आणि मोठा खर्च करून त्याची आवश्यक डागडुजी केली. जिल्हा मार्केट फेडरेशनच्या शिफारशीने जिल्हा पुरवठा विभागाकडून दापोली तहसीलदारांच्या मार्फत या गोडाऊनचा ताबा संघाकडे दिला जातो. मात्र हा ताबा दरवर्षी नवीन मागणी करून आणि शासनाच्या नवीन अटी-नियमांचे पालन करून दिला जातो. आंबा संघ वेळेवर कागदपत्रांची पूर्तता करून मागणी करत असला तरी, शेतकर्यांचे हित जपण्यासाठी त्यांना रत्नागिरी आणि दापोली येथे सतत फेर्या मारून प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागतो.
या खरेदी केंद्राचा फायदा केवळ केळशी परिसरातीलच नव्हे, तर मंडणगड तालुक्यातील देव्हारे, उमबरोली, वेळास तसेच केळशी खाडी किनारी असलेल्या
अनेक गावांना होतो. या केंद्रावर दरवर्षी दोन हजार क्विंटल भाताची खरेदी केली जात होती. शेतकर्याला त्याच्या मालाला हमीभावात चार पैसे मिळतील, या आशेवर तो सगळ्या अडचणींचा सामना करून भात पेरणी करत असतो. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. गोडाऊनचा ताबा न मिळाल्यास भात खरेदी केंद्र सुरू होणार नाही आणि शेतकर्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे, शासनाने शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन या गोडाऊनचा ताबा आंबा संघाला तातडीने द्यावा, अशी जोरदार मागणी केळशी परिसरातील शेतकर्यांकडून होत आहे.
www.konkantoday.com



