
टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत गावपातळीवर तपासणी व जनजागृती उपक्रम
पीएससी कुंभवडे कार्यक्षेत्र प्रिंदावण व कुंभवडे येथे एक्स-रे व टीबी तपासणी शिबिर यशस्वी
रत्नागिरी : टीबी मुक्त भारत अभियानाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून २५ नोव्हेंबर रोजी पीएससी कुंभवडे कार्यक्षेत्रात व्यापक तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. प्रिंदावण येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात दुपारी २ वाजेपर्यंत एकूण ७७ छातीचे एक्स-रे तसेच टीबी चाचण्या पार पडल्या. यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभवडे येथे दुपारी २ नंतर ६३ एक्स-रे व संबंधित टीबी तपासण्या करण्यात आल्या.
अतिदुर्गम भागामध्ये घेण्यात आलेल्या या तपासणी मोहिमेस जिल्हास्तरावरून तसेच स्थानिक स्तरावरून उत्तम प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात आरोग्य पर्यवेक्षक मंगेश पाटील, एक्स-रे टेक्निशियन हंगे, वैद्यकीय अधिकारी, (कुंभवडे) दिगंबर चौरे, वैद्यकीय अधिकारी (कुंभवडे) डॉ. शिंदे,आरोग्य सहाय्यक लांघी, समुदाय आरोग्य अधिकारी वनवे, आरोग्य सहायिक सौ. मदने, आरोग्य सहाय्यक कांबळे, एसटीएस कोकणे, एसटीएस सौ. मेळेकर, तसेच प्राथमिक केंद्रातील सर्व आरोग्य सेवक, सेविका, गटप्रवर्तक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांचा सक्रिय सहभाग लाभला.
या संपूर्ण मोहिमेसाठी जिल्हास्तरावरून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या सूचनेनुसार शिबिरामध्ये तपासणी झालेल्या सर्व रुग्णांची निक्षय पोर्टलवर १०० टक्के नोंदणी करण्यात येत असून, संबंधित सर्व तपासण्या तत्काळ भरण्याचे काम सुरू आहे.
“”अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे टीबी मुक्त भारत अभियानाला गावपातळीवर बळकटी मिळत असून, लवकर निदान–लवकर उपचार या धोरणालाही गती मिळत आहे. टीबीची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी,” असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी केले आहे.




