
जम्मू-काश्मीरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातीलअनेक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस दापोलीतून अटक,
जम्मू-काश्मीरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अखेर दापोलीतून अटक करण्यात आली आहे. जम्मू पोलिसांनी दापोली पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत ही महत्त्वपूर्ण अटक केली आहे.
मुस्ताक अहमद वाणी (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१३ मध्ये जम्मू येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वाणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो जम्मू आणि दिल्ली या परिसरांमध्ये लपून राहत होता.
अलीकडे तो दापोली तालुक्यातील आसूद येथे भाड्याच्या घरात राहत असल्याची गोपनीय माहिती जम्मू पोलिसांना मिळाली होती. त्याने काही काळ दापोलीतील खोंडा परिसरात फळ विक्रीचा व्यवसायही केला होता.दरम्यान, वाणी दापोलीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच जम्मू पोलिसांचे एक पथक तात्काळ दापोलीत दाखल झाले. आरोपी मुस्ताक अहमद वाणी आपली गाडी एका स्थानिक गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी घेऊन आला असताना जम्मू आणि दापोली पोलिसांनी अचानक छापा टाकून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.अटक केल्यानंतर वाणीला खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार जम्मू पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले. पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी जम्मू पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन जम्मूकडे रवाना झाले आहे.
या संपूर्ण कारवाईमध्ये दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या पथकाचे विशेष सहकार्य लाभल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



