
‘गोष्ट कावी कलेची’ लघुपटाचा शुक्रवारी निगुडे येथे प्रीमियर शो
शिल्पकार जयेश धुरी आणि चित्रकार अमोल टिळवे यांची उपस्थिती
सिंधुदुर्गनगरी : निगुडे (ता. सावंतवाडी) येथील माऊली मंदिरातील कावी कलेविषयी ‘घुंगुरकाठी’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी ‘गोष्ट कावी कलेची’ हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटाचा प्रिमिअर शो शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) रात्री ८ वाजता निगुडे येथील माऊली मंदिरात होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कारप्राप्त, पिंगुळी (कुडाळ) येथील ‘शिल्पधाम’ चे युवा शिल्पकार जयेश धुरी आणि कावी कलाकार अमोल टिळवे उपस्थित राहणार आहेत.
याआधी जाहीर केलेला हा कार्यक्रम अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलला होता. निगुडे येथील श्री देवी माऊली रवळनाथ पंचायत मंदिर हा प्राचीन आणि पारंपरिक कावी भित्तीचित्रकलेचा अप्रतिम नमुना आहे. सद्या कावी कला जवळपास नामशेष झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका हाताच्या बोटावर मावतील, एवढीच कावी कला असलेली मंदिरे शिल्लक आहेत. सद्या सर्वत्र जीर्णोद्धाराच्या नावाखाली प्राचीन व कोकणी पद्धतीच्या वास्तुशैलीची मंदिरे पाडून आधुनिक मंदिरे बांधण्याची स्पर्धा सुरु असताना निगुडेच्या ग्रामस्थांनी मात्र येथील मंदिराचे नूतनीकरण करताना त्यावरील मंदिरावरील कावी कलेचे जतन आणि संवर्धन करण्याचा अभिनंदनीय प्रयत्न केला आहे.
निगुडेच्या या मंदिराची आणि कावी कलेची माहिती सर्वदूर पोचावी, यासाठी ‘गोष्ट कावी कलेची’ हा ३० मिनिटांचा लघुपट तयार केला आहे. या लघुपटाचा प्रिमिअर शो म्हणजे प्रथम प्रदर्शन निगुडे येथील माऊली मंदिरात केले जाणार आहे. सर्वांना खुला असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन आडाळी येथील ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि निगुडे देवस्थान समितीने केले आहे.




