
काँग्रेस पक्षातील तीन नेते ६ वर्षांसाठी निलंबित
रत्नागिरी:
आगामी चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कार्यवाही केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमधील तीन सदस्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.
प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. निलंबीत करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये श्री. लियाकत सतार शाह, श्री. तुळशीराम दत्ताराम पवार, आणि श्री. राजेंद्र भूरण यांचा समावेश आहे. हे तिन्ही नेते चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथील रहिवासी आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी जारी केलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, “आपले हे कृत्य पक्षशिस्तीचा भंग करणारे आहे, त्यामुळे आपणास काँग्रेस पक्षातून पुढील ६ वर्षासाठी निलंबित करण्यात येत आहे. पक्षाने शिस्तभंग करणाऱ्यांवर कोणतीही नरमाई न दाखवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.




