उत्सव उद्योजकतेचा नावीन्यपूर्ण कार्यक्रमात महिला उद्योजिकांचा गौरव


रत्नागिरी : पुण्यातील ग्रामुन्नती संस्थेने उमेद अभियानाच्या तीन तालुक्यांतील उद्योजक महिलांसाठी उत्सव उद्योजकतेचा या नावीन्यपूर्ण कार्यक्रमात महिला उद्योजिकांचा गौरव करण्यात आला.

येथील स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडलेल्या या उत्सवात व्यावसायिक कौशल्यांवर आधारित असलेल्या खेळांचा उपस्थित महिलांनी आनंद घेतला आणि भरघोस बक्षिसे मिळवली. व्यवसायातील उलाढाल, नफा, तोटा व आर्थिक गणित कसे करायचे यासाठी ग्रामुन्नती.नेट या संस्थेने गणिताचे एक टूल केले होते. ते दाखवून महिलांसाठी एक मार्गदर्शनपर सत्र घेण्यात आले. त्याचा उपयोग करून व्यवसायाचे आर्थिक विश्लेषण प्रत्येक उद्योजिकेला करता येईल, असे यावेळी सांगण्यात आले. उस्मानाबाद व वर्धा येथून आलेले शब्बीर गवंडी आणि दिवाकर सायंकार या ग्रामुन्नतीच्या प्रशिक्षकांनी म्हणजेच कम्युनिटी रिसोर्स आंतरप्रेन्युअरनी (CoRE) हे सत्र घेतले. हे सत्र RAMP (Raising and Accelerating MSME Performance) या योजनेअंतर्गत पुण्याच्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरमार्फत राज्यातील लघुउद्योजकांसाठी राबविले जाते. ग्रामुन्नती आणि मराठा चेंबर यांची यासाठी भागीदारी आहे. या योजनेतून मराठा चेंबरमार्फत महिला उद्योजकांना सरकारी प्रमाणपत्र देण्यात आले.

रत्नागिरीत उपलब्ध असणारी फळे, भाजी वाळवून त्याचा व्यवसाय करणाच्या दृष्टीने रहेजा सोलर कंपनीचे महाव्यवस्थापक परमित यांना बोलावले होते. त्यांनी आंबा वाळविण्यासाठी सोलर ड्रायर या उपकारणामधून करता येणारा उद्योग, कंपनीद्वारे उत्पादित मालाच्या खरेदीची हमी यासंबंधी माहिती दिली. महिलांना नवीन उद्योगाची संधी यात दिसल्याचे प्रश्नोत्तरांवरून स्पष्ट झाले.

रत्नागिरीमधील तरुण व्यावसायिक अनबॉक्सचे संचालक गौरांग आगाशे यांच्या अनिकेत कोनकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून उपस्थितांना खूप प्रेरणा, मार्गदर्शन आणि संधी मिळाली. मुलाखतीतून त्यांचा उद्योजकीय प्रवास उलगडला.

बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत यांनी संस्थेद्वारे महिलांसाठी घेतल्या जाणाऱ्या उद्योजकीय कौशल्याधारित कोर्सेसची माहिती दिली. महेश गर्दे यांनी ‘अमृत’ योजना व उद्योगांसाठी सरकारी योजना यासंबंधी सांगितले.

कार्यक्रमात तीन तालुक्यातील अडीचशे उद्योजक महिलांमधून निवडण्यात आलेल्या नऊ उद्योजकीय यशोगाथांविषयीचा विशेषांक प्रकाशित करण्यात आला.

कार्यक्रमाची संकल्पना ग्रामउन्नती.नेटचे अमित अस्नीकर यांची होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अभियानाच्या अधिकाऱ्यांच्या सोबतीने हा उत्सव साकारण्यात आला. यासाठी एमसीसीआय, बीकेव्हीटीआय यांनी आर्थिक मदत केली.

अशा प्रकारचा उत्सव, त्यामधील उद्योजकीय संधी, अधिक प्रमाणात महिलांना उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button