सेंद्रिय शेती काळाची गरज आहे : कुलगुरु डॉ. संजय भावे

गोगटे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतर्फे आंतरराष्ट्रीय परिषद

रत्नागिरी : शेतीचा अभ्यास हा मूलभूत विज्ञानाचा भाग आहे. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने केलेले संशोधन प्रत्येक संशोधकाने केले पाहिजे. तंत्रज्ञानाची सांगड आपल्या संशोधनात घालता आली पाहिजे. विद्यार्थ्याना त्यांच्या आवडत्या विषयात संशोधन करू द्यावे. विद्यार्थ्यांनी जास्त मेहनत, नवीन कल्पकता सातत्याने दाखवली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले.

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. विवा एक्झिक्यूटिव्ह येथे झालेल्या कार्यक्रमात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, परिषदेच्या समन्वयक डॉ. मधुरा मुकादम व्यासपीठावर उपस्थित होते.

पहिल्या दिवशी डॉ. अकबर इनामदार, डॉ. के. जी. डॅनियल, डॉ. योगेश ओस्वाल, प्रा. स्वप्नदीपसिंग चिम्णी यांची व्याख्याने झाली. समारोपाच्या दिवशी डॉ. प्रदीप कुमार, डॉ. मीरा माईणकर, डॉ. विनायक कुलकर्णी, डॉ. प्रदीप सरवदे आणि डॉ. विश्वनाथ पाटील यांची उद्बोधक व्याख्याने झाली.

या परिषदेमध्ये देश विदेशातील महाविद्यालये व संशोधन संस्था तसेच उद्योजक सहभागी झाले होते. प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांनी वैज्ञानिक क्षेत्रातील विविध विषयांवर शोधनिबंध सादर केले. ६६ शोधानिबंधांचे सादरीकरण झाले. यात मूलभूत विज्ञान विभागातून शुभम जितुरी (यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा), रेश्मा देवरुखकर (गोगटे- जोगळेकर कॉलेज), सर्वेश कुंदरगी (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण). जैविक विज्ञान विभाग- मिथिला चिंचळकर (मॉडर्न कॉलेज, गणेश खिंड), दीपाली सुरवशे (देवचंद कॉलेज, अर्जुन नगर), फरहीन खान (गोगटे कॉलेज), ऑनलाइन विभागात सुनीलकुमार गुप्ता (मिठीबाई कॉलेज), प्रशांत जाधव (एएसपी कॉलेज, लांजा) हे उत्कृष्ट शोधनिबंध म्हणून गौरविले गेले. सूत्रसंचालन प्रा. बाबासाहेब सुतार यांनी केले.

भित्तीपत्रिका स्पर्धेचा निकाल
परिषदेदरम्यान विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी महाविद्यालयामार्फत संशोधन भित्तिपत्रिका सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत ३६ भित्तिपत्रिकांचे सादरीकरण झाले. मूलभूत विज्ञान प्राध्यापक गट नम्रता गांधी (दापोली अर्बन बँक सीनियर कॉलेज), पद्मनाभ सरपोतदार (गोगटे- जोगळेकर कॉलेज). विद्यार्थी गट- कौस्तुभ सरदेसाई, सार्थक जोशी, साक्षी पाध्ये, स्वरदा केळकर (गोगटे जोगळेकर कॉलेज), अथर्व बेंबळगे, श्रीकांत जाधव, फर्ग्युसन महाविद्यालय (पुणे). जैविक विज्ञान विभागात प्राध्यापक गट- प्राची भाटिया (गुरुनानक खालसा महाविद्यालय, मुंबई), रूपाली साळुंखे (फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे). विद्यार्थी गट- जैविक विज्ञान विभागात ऋतुराज पिलणकर (गोगटे जोगळेकर कॉलेज), निकिता राशिनकर (सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराड).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button