
चिपळूण जवळील खेर्डी एमआयडीसीतील श्री एम पेपर मिलला भीषण आग
*चिपळूण जवळील खेर्डी एमआयडीसी परिसरातील श्री एम पेपर मिल कंपनीला आज दुपारी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. दुपारी अवकाशात काळे धुराचे प्रचंड लोट दिसू लागल्यानंतर ही घटना उघडकीस आली. क्षणोक्षणी वाढणाऱ्या धुराच्या प्रमाणावरून ही आग गंभीर असल्याचं स्पष्ट होत होतं. तत्काळ स्थानिकांनी आणि कंपनीतील अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली.
अल्पावधीतच आग एवढ्या वेगाने पसरली की काही मिनिटांतच तिने रौद्ररूप धारण केले. पेपर मिल असल्याने कंपनीत मोठ्या प्रमाणात कागदाचा साठा होता. त्यामुळे ज्वाळांनी कागद आणि कच्च्या मालाला क्षणार्धातच कवेत घेतलं आणि आगीचं प्रमाण झपाट्याने वाढलं.
अग्निशमन दलाच्या संसाधनांबरोबरच जवळच्या औद्योगिक युनिट्समधील पाण्याचे टँकर आणि अतिरिक्त कर्मचारी मदतीला धावून आले.
घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका केली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती मिळते. मात्र कंपनीतील यंत्रसामग्री, कच्चा माल आणि इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.




