
कोकणच्या मातीमधीलपोपटीचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला
कोकणातली थंडी म्हणजे फक्त गारवा नाही तर जिभेवर नाचणाऱ्या चवींचाही हंगाम.सध्या सर्वत्र गुलाबी थंडीची चाहूल लागलेली आहे. त्यामुळे पोपटीचा सुगंध सर्वत्र दरवळू लागलेला आहे. कोकणच्या मातीमधील हा पारंपरिक प्रकार असून, त्याची चव जगातील कुठल्याही हॉटेलमध्ये मिळत नाही.
थंडीच्या दिवसांत वाल, पावटे यांचे भरघोस उत्पादन मिळू लागते. बाजारात त्यांचा सुगंध दरवळू लागतो आणि मग गावातील अंगणातून बोचऱ्या थंडीत पोपटीचा बेत आखला जातो. घरातली मडकी बाहेर काढली जातात, केळीची हिरवीगार पानं धुऊन मडक्याच्या आत लावली जातात. तळाशी भांबुर्डी किंवा भामरूटाचा पाला पसरवून जणू निसर्गाचंच अंथरूण तयार केले जाते. त्यावर एकेक थर घालत ही कोकणी जादू सुरू होते. वालाच्या शेंगा, पावटे, बटाटे, भाज्या, ओव्यासारखा अंगावर येणारा मसाला, हळदीचा सुवास आणि मांसाहार करणाऱ्यांसाठी मासे किंवा चिकनचे तुकडे. हे सगळं थरावर थर रचून मडक्याचं तोंड पुन्हा भांबुर्डीच्या पाल्याने घट्ट बंद केले जाते. अंगणात खड्डा खणून विस्तव पेटवून हे मडकं शेकोटीत ठेवलं जातं. दीड तासात त्या मडक्यातून उठणारा खमंग सुगंध पसरतो, त्यालाच पोपटी म्हणतात.




