
लियाकत शहा मुस्लिम फॅक्टर उचलून भाजपचा स्लीपिंग सेल म्हणून काम करत होते
चिपळूण : काँग्रेसच्या एबी फॉर्म प्रकरणावर शनिवारी धवल मार्ट येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग यांनी गंभीर आरोप करत सविस्तर स्पष्टीकरण दिले.
घाग म्हणाल्या, “लियाकत शहा माझ्या टेबलवरील एबी फॉर्म नकळत घेतला आणि माझ्या अनुपस्थितीत तो भरला. त्यानंतर त्यांची भूमिका सतत धार्मिक भावना भडकवणारी, केवळ मुस्लिम फॅक्टरबाबत बोलणारी आणि भाजपसाठी स्लीपिंग सेलसारखी होती. ही भूमिका काँग्रेससाठी धोकादायक असल्याने मी मूळ काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांना एबी फॉर्म दिला.”
त्या म्हणाल्या की, १७ तारखेला निवडणूक अधिकाऱ्यांकडून लियाकत शहा यांच्या अर्जात गंभीर त्रुटी असल्याचे समजले. मुलांची माहिती अपूर्ण, गुन्हेगारीबाबत नोंद नसणे यासारख्या चुका होत्या. “मी स्वतः त्यांना त्रुटी दुरुस्त करण्यास सांगितले. दुसरा अर्ज भरायला सांगितला. एबी फॉर्म जोडा असे सांगितले. पण त्यांनी ‘गरज नाही’ म्हणून नकार दिला. त्यांचा अर्ज बाद झाला,” असे घाग यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी दडवून ठेवलेल्या निर्णयाचा खुलासा केला. “हाताचा पंजा टिकला पाहिजे, ही माझी भावना होती. त्यामुळे मूळ काँग्रेसचे असलेले सुधीर शिंदे यांचा अर्ज मी सुरक्षित ठेवला. त्यांनी अर्ज भरला नसता, तर आज काँग्रेसचा पंजा रिंगणातच नसता,” असे त्या म्हणाल्या.
लियाकत शहा यांच्यावर टीका करताना घाग म्हणाल्या, “शहा मुस्लिम फॅक्टर उचलून भाजपच्या अजेंड्याला खतपाणी घालत आहेत. भाजपच्या सुरेखा खराडे मागील नगराध्यक्ष होत्या, त्यांच्या चुका त्यांना दिसत नाहीत, पण रमेश कदम यांनी केलेल्या दशकभर जुन्या मुद्द्यांवर ते ताव मारत आहेत, यावरून त्यांचा हेतू स्पष्ट दिसतो.”
सुधीर शिंदे यांच्या उमेदवारीबाबत त्या म्हणाल्या, “ते जिंकतील की नाही हे लोक ठरवतील, पण काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून हाताचा पंजा प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल, आमचे विचार पोहोचतील, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.”
काँग्रेसमधील एबी फॉर्म गोंधळाची आज झालेली स्पष्टोक्ती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
……………………..




