देवरूखच्या सप्तलिंगी लाल भाता‌’चे होणार ब्रँडिंग! जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न


देवरुख येथील सप्तलिंगी नदीचे निर्मल जल आणि स्थानिक शेतकऱ्यांची परंपरागत शेतीकला यांच्या मिलाफातून निर्माण झालेला लाल भात आता एका नव्या ओळखीसह समोर येत आहे.सप्तलिंगी लाल भात या नावाने हा औषधी, चविष्ट आणि पौष्टिक भात अधिकृतपणे ब्रँड केला जाणार आहे. याला राष्ट्रीय स्तरावर नेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे तालुक्याच्या कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे, अशी माहिती क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष्ा नितीन कोळवणकर यांनी दिली.ट्रेडर्स, कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रीकल्चर या चार स्तंभांवर कार्य करणाऱ्या क्रांती व्यापारी संस्थेने या ब्रँडच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. संगमेश्वर तालुका ॲग्रोस्टार शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी संकल्प प्राईड शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या सक्रिय सहकार्यातून हा प्रकल्प साकारला जात आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती आणि योग्य हवामानामुळे या भागातील लाल तांदळाला एक विशिष्ट नैसर्गिक सुगंध, चव आणि औषधी गुणधर्म प्राप्त झाले आहेत. याच भौगोलिक वेगळेपणाचा उपयोग करून देवरूखची ही ओळख आता जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सप्तलिंगी लाल भात हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी मानला जातो. यामध्ये लोहाचे प्रमाण मुबलक असल्याने तो रक्तवर्धक असून, शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतो. यातील उच्च फायबरमुळे पचनाच्या तक्रारी कमी होतात आणि पोट हलके राहते. तसेच नैसर्गिक अँटीऑक्सिडंटस्‌‍ आणि मॅग्नेशियममुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. विशेष म्हणजे याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर वाढण्याचे प्रमाण मंदावते, ज्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी हा भात लाभदायी ठरतो. याशिवाय झिंक, बी-विटामिन्स आणि खनिजे यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही हा भात उपयुक्त ठरतो. या उपक्रमामुळे संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला आता स्थिर बाजारपेठ आणि योग्य दर मिळणार असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उत्पादन, गुणवत्ता आणि मार्केटिंग या तिन्हींची सांगड घालत संगमेश्वर तालुक्यातून एक मजबूत ग्रामीण औद्योगिक बँड उभा राहत आहे. सप्तलिंगी लाल भात हा उपक्रम केवळ तंदुरुस्तीपुरता मर्यादित नसून तो स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यटन आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button