
रत्नागिरी जिल्ह्यात मनसेची माघार; उबाठा पक्षाला जाहीर पाठिंबा
*रत्नागिरीजिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मोठा निर्णय घेत आपल्या सर्व उमेदवारांची माघार जाहीर केली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांना अधिकृत पाठिंबा दिला आहे.
गत काही महिन्यांपासून मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चेत होते. त्या काळापासून दोघांमधील दुरावा कमी झाला असल्याचे मानले जाते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या ऐतिहासिक एकोप्याचे पडसाद दिसू लागले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांना परस्पर पाठिंबा देत असून, काही ठिकाणी मनसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे पक्षाने मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भातील पत्रही अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आले आहे.
रत्नागिरीत मनसेची ताकद उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मिळाल्यामुळे महायुतीविरोधात विरोधकांची ताकद वाढणार असून, या निर्णयामुळे संबंधित उमेदवारांचा विजय निश्चित होण्यास मोठी मदत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
*




