
रत्नागिरीत १९ जणांची माघार; ३२ जागांसाठी ११३ उमेदवार रिंगणात
रत्नागिरी : नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १५ जणांनी अर्ज मागे घेतले. यात बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या भाजपाच्या चारजणांसह एकूण १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, थेट नगराध्यक्षपदासाठी सहा तर ३२ नगरसेवकपदांसाठी ११३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी थेट तर काही ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार आहेत. भाजपा-शिवसेना महायुती विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष अशी लढत विशेष करून रत्नागिरीत रंगणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी प्रभाग ५ बमधून मंजुळा कदम, प्र. ४ ब मधून रोहन वरेकर, वक्रतुंड शेट्ये, प्र. ९ अ मधून शुभम सोळंकी ,तर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्र. ३ ब मधून हीना बावानी, प्र. १ अ मधून श्रेया शिंदे व प्रणाली रायकर, प्र. ४ ब मधून रफिक मुकादम, प्र. ९ ब मधून कल्पना मसुरकर व कामना बेग, प्र. १४ ब मधून श्रीनिवास तळेकर, प्र. १२ ब मधून करण नागवेकर, प्र. १० ब मधून विभव पटवर्धन, प्र. ५ अ मधून अभिलाष पिलणकर, प्र. ८ ब मधून सोमनाथ पिलणकर, प्र. ७ व ६ ब मधून प्राजक्ता रुमडे, प्र. ७ अ मधून नितीन माईण या अपक्ष उमेदवारांनी तर प्र. १२ अ मधून शिवसेना उबाठाच्या श्वेता योगेश कोरगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामध्ये भाजपाच्या चार बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
त्यामुळे थेट नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात असून ३२ नगरसेवकांच्या जागांसाठी आता ११३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजप-शिवसेना विरोधात शिवसेना उबाठा अशी लढत रंगताना दिसणार असली तरी राष्ट्रवादी अजित पवारांचे घड्याळ आणि काँग्रेसचा हात तर काही ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेही उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे काही प्रभागात चौरंगी व तिरंगी लढती रंगणार आहेत.
नगराध्यक्षपदासाठी सुश्मिता सुहास शिंदे (आप) , सावंत शिवानी राजेश (उबाठा शिवसेना) , शिल्पा प्रशांत सुर्वे (शिवसेना), वाहिदा बशीर मुर्तुझा (राष्ट्रवादी), प्राजक्ता प्रवीण किणे (अपक्ष), संध्या अनिल कोसुंबकर (अपक्ष) हे सहा उमेदवार रिंगणात आहेत.




