
भारताचा मोठा निर्णय; चिनी नागरिकांसाठी पुन्हा सुरू केला पर्यटक व्हिसा!
नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यापार तणाव वाढलेला आहे. भारत रशियाकडून कच्चं तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण तब्बल ५० टक्के टॅरिफ लादलेला आहे. त्यामुळे भारत -अमेरिकेतील संबंध बिघडल्याचं चित्र आहे. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारतावर टीका देखील करत आहेत. पण मागील काही दिवसांत हा तणाव निवळत असल्याचं चिन्हे दिसू लागले आहेत.
या घडामोडी सुरू असताना आता दुसरीकडे भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारताने जागतिक स्तरावर एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारताने जगभरातील चिनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा प्रवेश पुन्हा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सच्या हवाल्याने न्यूज १८ ने दिलं आहे.
भारत आणि चीनमधील नियंत्रण रेषेवर वर्षानुवर्षे सुरू असलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर आता दोन्ही देशातील संबंधांमध्ये काहीशी सुधारणा होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. वृत्तानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला जागतिक स्तरावर भारतीय दूतावासांनी चिनी नागरिकांकडून पर्यटक व्हिसा अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल-मे २०२० मध्ये गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारताने पर्यटक व्हिसा निलंबित केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध ताणले गेले होते.
भारत-चीन थेट विमानसेवा पाच वर्षांनी पूर्ववत
पूर्व लडाखमधील सीमावादानंतर बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाच वर्षांपासून खंडित असलेली भारत-चीन थेट विमानसेवा पूर्ववत झाली आहे. चीनच्या तियानजिन शहरात शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली होती. या भेटीनंतर २६ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू झाली.
कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षांनंतर सुरू
भारत आणि चीनने या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या चीन भेटीदरम्यान वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) लष्करी अडथळे संपवण्याच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.




