
भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नमिता कीर बिनविरोध
नव्या कार्यकारी मंडळाची निवड जाहीर
रत्नागिरी:
रत्नागिरीतील नावाजलेल्या भारत शिक्षण मंडळाच्या नव्या कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारी मंडळाच्या निवडीत अध्यक्ष पदावर नमिता रमेश कीर यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बिनविरोध म्हणून निवडून येण्याचा मान नमिता कीर यांना मिळाला. तर उपाध्यक्ष पदावर डॉ. अलिमिया परकार यांची निवड करण्यात आली आहे.
भारत शिक्षण मंडळाच्या नव्या कार्यकारिणीच्या निवडीकरिता नुकतीच सभा घेण्यात आली. या सभेत 2025 ते 2028 या तीन वर्षांकरिता नव्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. या सभेत नमिता रमेश कीर यांची संस्थेच्या सर्वोच्च पदावर बिनविरोध निवड झाल्याने, रत्नागिरीच्या शैक्षणिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कारभारात यापुर्वी कार्याध्यक्ष म्हणून तर आता अध्यक्ष म्हणून महिला नेतृत्वाची नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नूतन कार्यकारी मंडळामध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून डॉ. अलिमिया दाउद परकार यांची निवड करण्यात आली आहे. यापुर्वीही डॉ. परकार यांनी उपाध्यक्ष म्हणून संस्थेला मार्गदर्शन केले आहे. कार्याध्यक्षपदी श्रीराम अनंत भावे,
उपकार्याध्यक्ष पदावर सुनिल गणपत वणजू आणि डॉ. चंद्रशेखर जगन्नाथ केळकर, कार्यवाह पदावर धनेश रामकृष्ण रायकर, सहकार्यवाह पदावर विनय वसंत परांजपे
आणि श्रीकृष्ण महादेव दळी, खजिनदार पदी नित्यानंद रविंद्र भुते यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय विश्वस्तपदी चंद्रकांत सोनू घवाळी, विनायक कृष्णा हातखंबकर तर सदस्यपदी संतोष श्रीधर कुष्टे, संजय अनंत चव्हाण, सनातन शंकर रेडीज, नितिन यशवंत मोहिते, प्रविण प्रभाकर आंबेकर, विक्रम सुभाष लाड यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. कीर यांनी संस्थेच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे. रत्नागिरीतील शिक्षण क्षेत्रात भारत शिक्षण मंडळाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, आणि हे नवीन मंडळ संस्थेला पुढील स्तरावर घेऊन जाईल, अशी आशा व्यक्त होत आहे.




