
‘बालविवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प’ अभियान : विविध उपक्रमांचे आयोजन
रत्नागिरी, 19 ): महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत 15 ऑक्टोबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत ‘बालविवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प’ अभियान राबविण्यात येत आहे.
18 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या उपस्थितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सागर पाटील, गटविकास अधिकारी चेतन शेळके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृध्दी वीर आदींनी बालविवाह न करण्याची प्रतिज्ञा घेतली. बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांची जबाबदारी व कार्ये सांगण्यात आली. जिल्हा बालविवाह मुक्त करण्याकरिता सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन बालविवाह प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करणेकरिता सर्वांनी कटिबध्द रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बालविवाह मुक्त महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून जिल्ह्यातील बालविवाह पूर्णपणे थांबविणे यासाठी कठोर कार्यवाही करणे, गावोगावी व्यापक जनजागृती करणे, बाल विवाहाचे पोस्टर / बॅनर लावणे, ग्रामस्तरावर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्या कार्यशाळा घेणे इत्यादी उपक्रम घेण्यात येत आहेत. या अभियानाचा उद्देश सर्व शासकीय विभाग, धार्मिक नेते, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांना एकत्र आणून बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 व सुधारित मार्गदर्शिका 2022 ची अंमलबजावणी करून जिल्हा बालविवाह मुक्त करणे हा आहे.




