
धोपेश्वर देवस्थान इनाम जमिनीबाबत शासनस्तरावरून कार्यवाहीला वेग
राजापूर : शहरानजीकच्या धोपेश्वर येथील देवस्थान इनाम जमिनींबाबत शासनस्तरावरून कार्यवाहीला वेग आला आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी याबाबतचा आढावा घेण्यासाठी बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीत राजापूर धोपेश्वर देवस्थान इनाम जमिनीबाबत व यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत राजापुरातील प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. शशिकांत सुतार व ॲड. यशवंत कावतकर यांनी भूमिका मांडली.
जिल्ह्यातील सर्वच देवस्थान इनाम जमिनीबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्वच देवस्थान इनाम जमिनींबाबत आढावा घेतला. याबाबत शासनस्तरावर अहवाल सादर केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
शहरानजीकच्या धोपेश्वर गावातील देवस्थान इनाम जमिनीबाबत स्थानिक नागरिकांना निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत यापूर्वीच राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी राजापूर तहसीलदार, प्रांताधिकारी व त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित करून यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आमदार सामंत यांनी याबाबत शासन स्तरावरही पाठपुरावा सुरू केला आहे. धोपेश्वर येथील देवस्थान इनाम जमिनीबाबत असणाऱ्या अडचणी, समस्या व जनतेची मागणी मांडण्यासाठी ॲड. सुतार व ॲड. यशवंत कावतकर यांना सांगितले आहे.
जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राजापुरातील देवस्थान इनाम जमिनींबाबत स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी ॲड. सुतार व ॲड. कावतकर यांनी मांडल्या. यामध्ये घर बांधणी, व्यवसाय करणे, बँकांकडून कर्ज घेणे, गहाण खत करणे, खरेदी विक्रीचे व्यवहार करणे या सर्व प्रक्रिया अडचणीच्या ठरत असल्याचे नमूद केले. यावर तोडगा काढून योग्य निर्णय व्हावा, जागा मालक, शेतकरी यांना न्याय मिळावा अशी भूमिका मांडली.
यावर जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांची बाजू ऐकून घेत याबाबत शासनाकडे अहवाल सादर केला जाईल असे सांगितले. या बैठीकाला महसुल अधिकारी तसेच शिवसेना राजापूर तालुका प्रमुख दीपक नागले व अन्य उपस्थित होते.
आ. किरण सामंत यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने राजापुरातील हा देवस्थान इनामचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे ॲड. सुतार व ॲड. कावतकर यांनी सांगितले.



